मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबीयांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडतोय. या भेटीत ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा चर्चा ठाकरे बंधूंच्या भेटीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झालीय.
राज ठाकरे हे उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहचले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबातील राज आणि उद्धव यांच्या भेटींनी गेल्या वर्षभरात नवी लाट उसळली आहे. २००५ च्या फुटीनंतर दशकभरातील शांततेला छेद देऊन, या भेटींमुळे शिवसेना (यूबीटी) आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चेला उधाण आले. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटी मराठी माणसाच्या एकजुटीचे प्रतीक ठरल्या. केंद्रीय भाषा धोरणाविरोधात एकत्र येण्यापासून कुटुंबीय सोहळ्यांपर्यंत प्रमुख भेटींनी राजकीय समीकरणे बदलली. याबद्दल जाणून घेऊया.
ठाकरे कुटुंबातील नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यांमध्ये राज आणि उद्धव यांची अनपेक्षित भेट झाली. १५ डिसेंबरला रश्मी ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नप्रसंगी राज उपस्थित होते, तर २२ डिसेंबरला राज यांच्या भाच्याच्या लग्नात दोघे प्रत्यक्ष बोलले. ही भेट कौटुंबिक असली तरी, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय सलोख्याची सुरुवात मानली जाते. यामुळे मराठी मतदारांच्या एकजुटीवर चर्चा सुरू झाली.
१९ एप्रिलला महेश मांजरेकरांच्या पॉडकास्टमध्ये राज यांनी ‘महाराष्ट्र हितासाठी वाद मागे ठेवता येतील’ असे सांगितले. उद्धव यांनीही ‘माझ्या बाजूने कधी वाद नव्हता’ असे प्रत्युत्तर देत, महाराष्ट्राच्या हितासाठी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली. ही भेट प्रत्यक्ष नव्हती, पण विधानांमुळे राजकीय दरी कमी करण्यास मदत झाली.
५ जुलैला २० वर्षांनंतर प्रथमच दोघे एकाच व्यासपीठावर आले. त्रिभाषा धोरणाविरोधात वरळीतील रॅलीत राज-उद्धव यांनी सरकारला इशारा दिला. ‘एकत्र आलो आहोत, एकत्रच राहू’ असे उद्धव यांचे उद्गार ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ही भेट राजकीय पुनर्मिलनाची पायाभरणी ठरली, ज्यामुळे भाषा धोरण रद्द करण्यास सरकारला भाग पाडले.
२७ जुलैला उद्धव यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त राज यांनी मातोश्रीला भेट दिली. गुलाबाची माळ घेऊन ‘मोठ्या भावांना शुभेच्छा’ असे म्हणत राज यांनी बंधुभाव दाखवला. ही भेट ६ वर्षांनंतर मातोश्रीवर राज यांची उपस्थिती असल्याने खास ठरली. मनसे नेतेही सहभागी झाले, ज्यामुळे युतीच्या चर्चेला वेग आला.
गणेशोत्सवात उद्धव यांनी राज यांच्या शिवतीर्थला भेट देऊन दर्शन घेतले, ज्यात आदित्य आणि रश्मी ठाकरे उपस्थित होते. नंतर १० सप्टेंबरला पुन्हा शिवतीर्थवर २.५ तासांची बैठक झाली. संजय राऊत व अनिल परबांसह उद्धव यांनी बीएमसी जागावाटपावर चर्चा झाल्याचे कळते. राज यांच्या आईच्या विनंतीने ही भेट होती. या भेटींमुळे ठाकरे बंधूंची केमिस्ट्री पुन्हा जागी झालीय.
5 ऑक्टोबरला संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधुंची एकत्रीत उपस्थिती दिसली. हे मराष्ट्रातील तमाम ठाकरेप्रेमींसाठी सुखद चित्र आहे. उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरेही संजय राऊतांच्या नातीच्या बारश्याला उपस्थित झाले. तसेच यानंतर सुप्रिया सुळे यांनीदेखील या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती.