मुंबई / नगर सह्याद्री : अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
आजच्या बैठकीत झालेल्या या निर्णयानंतर नागरिकांची ही मागणी पूर्ण झाली आहे. या बैठकीत अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे.
हा निर्णय होण्यात आमदार संग्राम जगताप, दत्ता भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.