अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यांत दुचाकी वाहनांची चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. टोळींकडून तब्बल 8 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या. अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाला या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी ओमकार उर्फ भैय्या शैलेश रोहम, (रा.रांजणगाव रोड, ता.राहाता) याचेकडे चोरीच्या मोटार सायकल असून तो विक्रीसाठी राहाता ते पिंपळस रोड येथे येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत ओमकार उर्फ भैय्या शैलेश रोहम (रा. रांजणगाव रोड, ता.राहाता) सोनु सुधाकर पवार (रा. साकुरी, ता. राहाता) अशांना ताब्यात घेतले.
तसेच त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ताब्यातील दुचाकी साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर (रा. पिंपळगाव जलाल, ता. येवला) याचेसह राहाता व श्रीरामपूर येथून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच नाशिक, पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या दुचाकी खटकळी येथील काटवनात लावलेल्या असल्याची माहिती दिली.
वरील आरोपी विरोधात राहाता, श्रीरामपुर, येवला, पुणे शहर, नांदगाव येथे गुन्हे दाखल आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोसई/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, गणेश लोंढे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, अशोक लिपणे, रणजीत जाधव, रमीजराजा आत्तार, भगवान थोरात, सुनिल मालणकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड व महादेव भांड यांनी बजावली आहे.