spot_img
अहमदनगरभोस, शेलार यांच्या राजकीय प्रवासासह एकनीष्ठतेची श्रीगोंद्यात खिल्ली!; मांडवली अन् ओटीभरणाच्या चर्चा...

भोस, शेलार यांच्या राजकीय प्रवासासह एकनीष्ठतेची श्रीगोंद्यात खिल्ली!; मांडवली अन् ओटीभरणाच्या चर्चा जोरात!

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
महायुती आणि महाविकास आघाडी अशी राज्यात लढत होत असताना श्रीगोंदा मतदारसंघ त्याला अपवाद ठरला आहे. या मतदारसंघात युतीचे विक्रम पाचपुते यांच्या विरोधात अपक्ष राहुल जगताप यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. जगताप विरुद्ध पाचपुते अशी लढत होत असताना नागवडे बॅकफुटवर जाण्यात बाबासाहेब भोस आणि घनश्याम शेलार यांच्या भूमिकाही कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. सर्वात आधी झालेली बाबासाहेबांची मांडवली आणि त्यानंतर उमेदवारी माघारी घेण्यात घनश्यामअण्णांचं झालेले तगड ओटीभरण याची चर्चा काही केल्या थांबायला तयार नाही. भोस आणि शेलार या दोघांनीही मांडवली अन् ओटीभरणाच्या चर्चेचा इन्कार केला असला तरी या दोघांचीही एकूणच आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीला साजेशीच भूमिका समोर आल्याने श्रीगोंदेकरांमध्ये हा विषय त्यांची खिल्ली उडविणारा ठरला आहे.

पाचपुतेंचा पराभव फक्त जगतापच करु शकतात असं
ठासून सांगणार्‍या भोसांना कोणती उपरती आली?
बाबासाहेब भोस हे जगतापांना ‘टार्गेट’ करीत आहेत. पण यामागे खूप मोठा ’अर्थ’ दडलेला आहे. अगदी महिनाभरापूर्वी राहुल जगताप यांची भक्कम पाठराखण करणारे बाबासाहेब भोस हे, पाचपुतेंचा पराभव फक्त जगतापच करु शकतात हे ठासून सांगत होते. नागवडेंकडे गावागावात कार्यकर्तेच नाहीत हे भोस यांचे मत होते. राहुल जगतापच आमदार होतील हे भोस यांना आजही मान्य असेलच पण ‘दुहेरी ओटीभरण’ वजनदार ठरल्यानंतर खाल्या मिठाला जागलेच पाहिजे या भूमिकेतून त्यांनी राहुल जगतापांना ‘टार्गेट’ करायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. गणेश भोस यांना श्रीगोंदा नगरपरिषदेला निवडून आणण्यासाठी याच राहुल जगताप यांची मदत बाबासाहेब भोस यांना घ्यावी लागली होती. अन्यथा त्यांचा त्याच निवडणूकीत ‘निकाल’ लागला असता. भोस हे भूमिका बदलण्यात ‘माहीर’ आहेत. सहकारी कार्यकर्ते, मित्र यांना ‘बाटली’त उतरवणारे भोस नेहमी स्वत:चे ‘कोटकल्याण’ करण्यातच धन्यता मानत आले आहेत. मंत्रीपदाचा दर्जा मिळवूनही कार्यकर्त्यांचे संघटन व कामे याचा ‘दर्जा’ भोस यांना राखता आला नाही. ‘बसणारे’ सहकारी व गोतावळ्यातील ‘बैठका’ हेच काय ते त्याची जमेची बाजू! एकही जुना सहकारी त्यांच्यासोबत आजपर्यंत टिकला नाही. ‘टेंडर’ घेवून काम करणारे राजकारणी ही भोस यांची तयार झालेली ओळख आज आणखी अधोरेखीत झाली इतकेच!

भोस यांचा ‘एकनिष्ठ राजकीय प्रवास’ अन्
चिरंजीव आजही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत!
जिरायत भागातील कार्यकर्ता म्हणून उदयास आलेल्या बाबासाहेब भोस यांची १९७९ साली जिल्हा परिषदेत एंट्री झाली ती अपक्ष म्हणून. त्यानंतर भोस यांनी काँग्रेस, १९९५ ला अपक्ष, पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, विनय कोरे यांची जनसुराज्य पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करुन पुन्हा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असा ‘एकनिष्ठ राजकीय प्रवास’ केलेला आहे. कारखाना सत्तेचा ’लाभ’ घेण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करीत त्यांनी त्यांची निष्ठा सिध्द केलेली आहे. त्यांचे सुपुत्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले होते. ऑन रेकॉर्ड ते अजूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच आहेत.

काटामारी, ऊसाचे बोगस गाळप, ‘युवराजां’च्या
विवाहासाठी जमवलेली सक्तीची वर्गणी अन् बरेच काही!
राहुल जगताप यांच्यावर शेतकरी, कामगार, वाहतुकदारांचे पैसे थकविल्याचा आरोप करणा-या राजेंद्र नागवडे व अन्य नेत्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. ‘कर्मयोगी जगताप कुकडी’ कारखान्याकडे देणी होती पण ती कारखाना आर्थिक संकटात आल्यामुळे थकली. पण कारखाना आर्थिक अडचणीत आणण्याचे व कारखान्याची आर्थिक कोंडी करण्याचे पातक कोणाचे? हे येथील शेतकरी,कर्मचारी व वाहतुकदारांनाही माहिती पडले हे एका अर्थाने बरे झाले. कारखान्याने आता जवळपास ९९ % देणी अदा केली आहेत.पण आरोप करणा-या राजेंद्र नागवडे यांच्या ‘नागवडे’ कारखान्याची स्थिती विदारक आहे. कारखान्यातील साखर विक्री घोटाळा, नातेवाईक, मुल व बगलबच्च्यांच्या नावाने कारखान्यात केलेली ‘काटामारी’ व हजारो मेट्रीक टन ऊसाचे बोगस टनेज(गाळप), मशिनरी व मालखरेदीतील ‘राज’, मोलासेस विक्री घोटाळा, उत्पादन शुल्क विभागाची दौंड येथील न्यायालयात चालू असलेली मोलासेस चोरी व विक्रीची केस, कर्मचा-यांची उठसूठ घेतल्या जाणा-या सक्तीच्या वर्गण्या,शिक्षण संस्थेतील नोकरभरतीतील ‘अर्थकारण’ जगजाहीर आहे. ऊसतोडणी कामगार, वाहतुकदार,कर्मचारी व ठेकेदारांकडून सक्तीने ‘युवराजां’च्या विवाहासाठी जमा केलेली वर्गणी याची जाहीर चर्चा गल्लीबोळात आहे.त्या ‘कर्तबगारी’चे पुरावे सोशल मिडीयात धुमाकूळ घालीत आहेत. चाळीस वर्षात बबनराव पाचपुतेंनी केवळ ‘बोलबच्चन’ करुन भुलविल्याचे नागवडे आता सांगत सुटले आहेत. मग पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा ‘चरणस्पर्श’ करुन अहोरात्र पाचपुतेंचे गोडवे गाणा-या नागवडेंना हेच पाचपुते कामाचे नाहीत याची जराही जाणिव का झाली नाही? कोणत्याही समर्थकाला काहीच कल्पना न देता राजेंद्र नावगडे हे २०१९ ला भाजपात व पुढे २०२४ मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले! त्यानंतर आता पंधरा दिवसांपूर्वी शिवसेनेत गेले! हे सारे करताना त्यांनी एकट्याने निर्णय घेताना जनतेला गृहीत धरले! आता तीच जनता नावगडेंना उद्देशून ‘आम्हाला गृहीत धरु नका’, असे म्हणत असेल तर त्यात चुकीचे काय?

‘खास खुबी’ने मशहूर असणार्‍या साजनने देवदैठणमध्ये ‘लख्ख’ दिवे लावले!
शिवसेनेचे उपनेते व काष्टीचे सरपंच साजन पाचपुते हे कारखान्याच्या मुद्द्यावर जगतापांना घेरण्यात मागे नाहीत. स्व.सदाअण्णांनी जीवापाड जपलेल्या देवदैठणच्या पूर्वीच्या साईकृपा व आताच्या साजन शुगरमध्ये याच साजनने किती ‘लख्ख’ दिवे लावून तो बंद पाडला हे श्रीगोदेकर विसरलेले नाहीत. काष्टी सरपंच निवडणुकीच्यावेळी राहुल जगतापांच्या मदतीसाठी ‘गयावया’ करणारे साजन पाचपुते हे केवळ स्वत:चे ‘सेटींग’ झाकण्यासाठीच जगतापांवर आगपाखड तर करत नाहीत ना अशी शंका आता येऊ लागली आहे. साजन पाचपुते यांचे राजकीय अस्तित्वच मुळात ‘तकलादू’ असल्याचे निकालाने स्पष्टपणे समोर येणार आहे. साजन पाचपुते याची ‘खास खुबी’ सेनेच्या नेत्यांसोबतच येथील जनतेलाही कळून चुकली आहे.

अबब… पक्षांतराचा विश्वविक्रम ठरणारे घनश्याम शेलारांचं भरकटलेले जहाज!
उद्वव ठाकरेेंच्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत आघाडीचा पुळका दाखवणा-या घनशाम शेलारांचं भाषण ऐकणार्‍या अनेकांना हसू आवरत नव्हते. आता थांबणार नाहीच, असं म्हणणारे शेलार का थांबले व थोडीशी विश्रांती घेवून आघाडीच्या व्यासपीठावर कसे गेले! श्रीगोंदेकरांना अण्णांचा हा प्रवास आणि त्यातून जे काही ओटीभरण झालं याची पूर्ण कल्पना आली आहे. शेलार काहीही सांगत असले तरी मतदार त्यांची ‘खोया’वाला ‘बोका’ अशी ओळख सांगत सुटले आहेत. पाच वर्षापूर्वी जी सहानुभूती त्यांना मिळाली होती ती आज त्यांनी स्वत:च्या खोकेबाजीने घालवून टाकली! घनशाम शेलार यांनी १९८६ साली ग्रामीण विकास युवक संघटनेतून राजकारण सुरु केले. त्यानंतर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस, बी आर एस., काँग्रेस, प्रहार आणि पुन्हा काँग्रेस असा घनशाम शेलारांचा ‘विश्वविक्रमी’ राजकीय प्रवास राहिला आहे. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षात तर ते केवळ काही तासच राहिले. त्यांनी प्रहारमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या दैनिकांमध्ये छापून येण्यापूर्वीच ते काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले. पक्षांतराचा हा प्रवास आज कदाचित घनश्याम शेलार यांनाही आठवणार नाही. मात्र, श्रीगोंदेकरांच्या राजकीय डायरीत त्याची नोंद नक्की आहे. पाच वर्षापूर्वीची अण्णांची श्रीगोंदेकरांच्या लेखी असणारी राजकीय किंमत आज शुन्य झालीय इतकेच!

कम्युनिस्ट, रिपाइं वगळता सार्‍या राजकीय पक्षांना
राजेंद्र नागवडेंची गवसणी!
युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात  सक्रिय झालेल्या राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंदा तालुका ग्रामीण विकास युवक संघटना,काँग्रेस, १९९५ ला अपक्षाबरोबर, पुन्हा काँग्रेस,२००९ साली भाजप,२०१० साली पुन्हा काँग्रेस, २०१४ ला काँग्रेस उमेदवाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेससोबत, २०१५ ला पुन्हा काँग्रेस, २०१९ ला पत्नी काँग्रेसमध्ये आणि स्वत: भाजपमध्ये प्रवेश, २०२० मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश, जानेवारी २०२४ राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश, ऑटोबर २०२४ मध्ये शिवसेना उध्दव ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये आधी केलंय आता पारनेरमध्ये करुन दाखवणार; नेमकं काय म्हणाले संदेश कार्ले पहा..

नगरप्रमाणेच पारनेर तालुक्यातील प्रचार दौर्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद पारनेर | नगर सह्याद्री विधानसभा निवडणूक म्हटलं...

भुजबळांच्या बालेकिल्ल्यातच मनोज जरांगें कडाडले; म्हणाले मी ठरवलं तर…

नाशिक / नगर सह्याद्री - मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काही...

राज्यात सत्तांतर होणार; शरद पवार यांनी सांगितले खरे कारण…

पुणे / नगर सह्याद्री – लोकसभा निवडणुकीत पक्षफोडी करणाऱ्या भाजपला जनतेने नाकारले आहे. तीच...

झुंडशाहीला लगाम घालण्यासाठी पुढे या!; काशिनाथ दाते काय म्हणाले पहा…

पारनेरमधील महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांचे मतदारांना पाच वर्षापूर्वीची चूक दुरुस्त करण्याचे आवाहन पारनेर |...