मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून दिलेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार आहे. दिल्लीतील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर ग्रीन सिग्नल दिला गेला असला तरी, हाय कमांडकडून अद्याप कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा केली गेलेली नाही.
दिल्लीच्या हाय कमांडकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘धक्का तंत्र’ वापरले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नावावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे, आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच विराजमान होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली गेली आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या होत्या. अशात जनमताचा अनादर होऊ नये, असाही एक मतप्रवाह भाजपाच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे.
विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा तापवला आहे, अशातच मराठा आरक्षणाचा मुद्दा ही पुन्हा तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दिल्ली दरबारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्याशिवाय आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता या सगळ्याचाही गांभीर्याने विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस ‘Kingmaker’
देवेंद्र फडणवीस हे किंगमेकर असून त्यांचा प्रशासनातील अनुभव मोठा आहे, त्यामुळे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री हवेत अशी अनेकांची इच्छा आहे.मुख्यमंत्री पदावर मराठा चेहरा असावा यासाठी भाजपचे हाय कमांड गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली असून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच विराजमान होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली गेली आहे.