अहमदनगर। नगर सहयाद्री:-
तरुणांची लग्नाची मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. प्रत्येक गावात लग्न रखडलेले ३० ते ४०वयोगटांतील किमान २५-३० तरुण सध्या दिसत आहेत. यामुळे अनेक गावांमध्ये लग्नासाठी विकत मुली आणण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच लग्नाळू तरुणांची फसवणूक झाल्याचे प्रकार देखील समोर आले आहे.
अशा लग्नाळू तरुणांचे लग्न लावून देणाऱ्या टोळीला श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीने राज्याच्या विविध भागात एकाच महिलेचे अनेकांच्या बरोबर लग्न लावले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अशोक उगले (रा. मुंगूसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी: आरोपींनी संगनमत करत मध्यस्थीमार्फत लग्न लावून देण्यासाठी फिर्यादीकडून २ लाख १५ हजार रु. घेऊन एका महिलेसोबत लग्न लावून दिले. त्यानंतर काही दिवसातच संबंधित महिला पळून जात असताना फिर्यादीचे आईने आरोपी महिलेला पकडून ठेवले. यावेळी आरोपी महिलेने फिर्यादीच्या आईच्या डोळ्यात मिरचीपूड टाकत, शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी अन्य आरोपींनीदेखील फिर्यादीच्या आईला मारहाण केली असल्याचे फिर्यादी दाखल केली होती.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक तपासा आधारे आरोपी आशा गौतम पाटील, सिमरन पाटीलू, शेख शाहरुख शेख फरीद, दीपक पाडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील, सचिन बलदेव राठोड उर्फ राज रामराव राठोड, युवराज नामदेव जाधव, सर्व राहणार यवतमाळ यांना अटक केली आहे
त्यांच्याकडून फसवणूक केलेली रोख रक्कम व त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी गाड्या असा १३ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.