अहमदनगर। नगर सहयाद्री
भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह लोकसभा मतदारसंघात साखर वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. शहरातील भाजप नगरसेवकांसह काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवकही हा कार्यक्रम घेत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या नगरसेवकांना सूचना देऊन खा. विखे यांची साखर प्रभागात वाटू नका, अन्यथा पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी कारवाई करू, असा इशारा दिला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर रोहिणी शेंडगे, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्या नावाने साखर वाटप कार्यक्रम न करण्याबाबतचा संदेश व्हॉट्सअप ग्रुपवरून देण्यात आला आहे.भाजपाचे खासदार सुजय विखे यांच्यावतीने संपूर्ण नगर शहरात साखर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. ते शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व नगरसेवकांना फोन करून कार्यक्रम आपापल्या वॉर्डात घेण्यास सांगत आहेत.
नगरसेवकांनी व पदाधिकार्यांना साखर वाटपाचा हा कार्यक्रम आपल्या वॉर्डात घेऊ नये. जर हा कार्यक्रम कोणत्याही नगरसेवक किंवा पदाधिकार्यांनी घेतला तर ही पक्ष विरोधात भूमिका समजून त्या संदर्भात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची तक्रार पक्षाकडे केली जाईलफ, असे या संदेशात म्हटले आहे.
या संदर्भात शहरप्रमुख कदम यांना विचारले असता, साखर वाटपाचा कार्यक्रम खासदार विखे यांचा वैयक्तिक कार्यक्रम आहे. यात शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी सहभागी होण्याचा प्रश्नच येत नाही. पक्षशिस्तीच्या दृष्टीने हे योग्य नसल्यामुळे नगरसेवकांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.