अहमदनगर | नगर सह्याद्री
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार न करता पर्यावरण पूरक मूर्ती तयार कराव्यात. तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनविण्यासाठी वापरले जाणार्या पिओपी साहित्याची विल्हेवाट लावावी. असा साठा आढळून आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने गणेश मूर्ती बनवणार्या कारखानदारांना दिला आहे.
पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याबाबत व पीओपीच्या मूर्तींबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या पत्राच्या आधारे महापालिकेने शहरातील १३० कारखानदारांना नोटीसा बजावल्या आहेत. अहमदनगर जिल्हा गणेश मुर्तिकार संघटनेने याचा निषेध करत ही नोटीस अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.
पी ओपी मूर्तीच्या उत्पादन व विक्रीवर कोणतीही बंदीनसल्याचे सरकारने विधान परिषदेत मागील वर्षी स्पष्ट केलेले आहे. तरीही चुकीचा अर्थ काढत या नोटीसा बजावण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. चुकीचा संदर्भ घेऊन शहरातील व जिल्ह्यातील कुटुंबांना बेरोजगार करू नये, असे मत संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर यांनी म्हटले आहे.