जालना / नगरसह्याद्री : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सरकारने २४ डिसेम्बर पर्यंत आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुदत दिली होती. परंतु आता ही तारीख जवळ येऊनही काहीच घोषणा नाही.
राज्य मागासवर्गीय आयोगाने अहवाल दिल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. म्हणजेच २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण बाबत काही निर्णय होईल याची शक्यता धूसर आहे.
त्यातच आता राज्यभरातून मराठा आंदोलक २४ तारखेला मुंबईत ट्रॅक्टर आणून चक्का जाम करणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्याच्या गृहखात्याला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, राज्यात मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २४ डिसेंबरला मुंबई येथे कार्यकर्त्यांचा जमाव होण्याची शक्यता आहे. त्यात हा जमाव जमवण्यासाठी राज्यातून विविध भागातून ट्रॅक्टरही वाहने मुंबई आणली जाणार आहेत.
त्याने वाहतुकीचा मोठा फटका बसणार असून त्यातून लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल. तसेच लोकांची गर्दी जमून जाळपोळ, गाड्या फोडणे, रस्ता अडवणे, टायर जाळणे आदी प्रकार होऊ शकतात अशी माहिती पोलिसांना कळाली आहे. त्यामुळे मुंबई तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस अलर्ट झाले आहे.
पोलिसांनी राज्यभरात अनेक ट्रॅक्टर मालकांना १४९ अंतर्गत नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत म्हटलंय की, आपल्याकडे असलेले ट्रॅक्टर शेतीच्या उपयुक्त कामासाठी घेतलेले आहेत.
त्याचा वापर शेतीसाठीच करावा. आपल्याकडे कुणीही मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते, नागरीक ट्रॅक्टरच्या मागणीसाठी आल्यास त्यांना ट्रॅक्टर देऊ नये आणि स्वत:ही ट्रॅक्टरसोबत घेऊन जावू नये. आपण त्यांना ट्रॅक्टर पुरवल्यास किंवा घेऊन गेल्यास आरक्षण संबंधाने गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्याचसोबत कुठलीही शांतता भंग करणारी घटना घडल्यास आपल्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून सदर ट्रॅक्टर जप्त करण्यात येईल अशी खबरदारीची नोटीस पोलिसांनी बजावली आहे.