बीड । नगर सहयाद्री:-
बीडमध्ये सध्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. अशातच बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांच्या शासकीय निवासस्थानावर पोलीस कर्मचाऱ्यानेच गांजाची नशा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर बीडच्या पोलीस दलात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बाळू गहिनीनाथ बहिरवाळ असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत कावत यांच्या शासकीय निवासस्थानाचे काम सुरू आहे. त्यांच्या निवासस्थानी तीन सुरक्षारक्षक नियुक्त होते. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास अंगरक्षक गणेश थापडे यांनी सुरक्षा रक्षकांकडे पाहणी केली, त्यावेळी बहिरवाळ हा नशेत असल्याचे त्यांना दिसून आले. बहिरवाळ हा नशेत असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस मुख्यालयाचे निरीक्षक पांडुरंग दलाई यांना माहिती दिली आणि शिवाजीनगर पोलिसांनाही पाचारण केले.
शिवाजीनगर पोलिसांनी बहिरवाळची अंगझडती घेतली असता गांजा ओढण्याचे साहित्य सापडले. त्यानंतर बहिरवाळ याला वैद्यकीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बहिरवाळ यांना निलंबित केले आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी चौकशी सुरू आहे.