अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता. जि. अहिल्यानगर) येथे गुरुवारी घडली. या प्रकरणी बाबासाहेब प्रभाकर कराळे (वय 44, रा. कापुरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बाबासाहेब व सुरेखा कराळे (वय 32, रा. कापुरवाडी) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विजय रघुनाथ कराळे, पोपट रघुनाथ कराळे, शरद रावसाहेब कराळे, सोपान झुंबर कराळे, ज्ञानदेव झुंबर कराळे, संदीप अशोक कराळे, बजरंग अशोक कराळे, अशोक चिंतामण कराळे (सर्व रा. कापूरवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपींच्या जांभाच्या झाडाच्या फांद्यांमुळे फिर्यादीच्या शेतातील कांद्याच्या पिकाचे नुकसान होत असल्याने त्यांनी आरोपींना फांद्या तोडण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपींनी बाबासाहेब व सुरेखा कराळे यांना मारहाण केली. अधिक तपास भिंगार कॅम्प पोलिस करत आहेत.
दुसऱ्या फिर्यादीत कापुरवाडी येथे झाडाच्या फांद्याच्या किरकोळ वादातून एकास मारहाण व मोटार पेटीची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी सोपान झुंबर कराळे (वय 37, रा. कापुरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन आरोपींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबासाहेब प्रभाकर कराळे व सुरेखा बाबासाहेब कराळे (दोघे रा. कापुरवाडी) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंब्याच्या झाडाच्या फांद्यांमुळे कांद्याच्या पिकाला होणाऱ्या नुकसानीमुळे फांद्या काढण्यावरून वाद झाला. फिर्यादी समजावून सांगत असताना दोघांनी लोखंडी गजाने पाईपलाईन, इलेक्ट्रिक मोटर पेटी व स्टार्टरचे नुकसान केले. फिर्यादीला पाठलाग करून मोटरसायकल आडवी लावून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.