पुणे / नगर सह्याद्री –
राज्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरी मार्च महिन्याच्या मध्यानंतर राज्यात उन्हाची तीव्र स्वरुपाची झळ बसत होती. पुढच्या काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण जाऊन तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मार्च महिन्यात २७ उष्माघाताचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक, गर्भवती महिला, स्तनदा माता, जास्त शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्ती आणि सहव्याधीग्रस्त रुग्ण यांच्यावर उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक परिणाम होतो, असे सांगितले जाते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात उष्णता प्रचंड वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. शहरातील एकूण तापमान ४० अंशाच्या जवळ जाऊन धडकल्याचे चित्र आहे.
IMDच्या अंदाजानुसार, पुढचे काही दिवस मध्य महाराष्ट्राता ढगाळ स्वरुपाचे वातावरण राहणार असून काही भागात हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर याच महिन्यात तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहू शकते असे देखील सांगण्यात आले आहे. उन्हाळा कडक असल्याने लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना शरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, गर्भवती महिलांनी शक्यतो उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.