Weather News: राज्यात अवकाळी पावसाने उसंत घेतली त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. एकीकडे अवकाळी पाऊस गेला असला तरी दुसरीकडे उन्हाचे चटके आणखी वाढणार आहे. सूर्य पुन्हा आग ओकणार असून राज्यातील अनेक जिल्ह्याचे तापमान ४० अंशांवर जाण्याची शक्यता आहे. रविवारी अनेक जिल्ह्यातील तापमान ४० अंशावर पोहचल्याचे पाहायला मिळाले. आता हवामान खात्याकडून राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील इतर जिल्ह्यांतील तापमानात वाढ होऊन उन्हाच्या झळा आणखी वाढणार आहेत. तर उकाड्यातील वाढ कायम राहिल. आज कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात ढगाल वातावरण राहिल आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. वाढती उष्णता लक्षात ङेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे देखील सांगितले जात आहे.
दरम्यान, रविवारी राज्यातील ब्रह्यपुरी, चंद्रपूर, नागपूर, धुळे, जळगाव आणि नाशिक याठिकाणी उष्णाचा पारा जास्तच वाढला होता. संभाजीनगर, परभणी, सोलापूर, बुलडाणा, भंडारा आणि गडचिरोलीमध्ये तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहचले होते. पुण्यातही तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. संभाजीनगर यंदाच्या उन्हाळ्यातील रविवार सर्वात जास्त हॉट ठरला. संभाजीनगरमध्ये यावर्षी ४०.२ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. यंदाच्या उन्हाळ्यातील हे रेकॉर्डब्रेक तापमान आहे. सकाळी ११ ते ५ पर्यंत कडक उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य होते. तापमान प्रचंड वाढल्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत.