सुपे / नगर सह्याद्री : सुपे येथील जुन्या एमआयडीसीमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच काही कंपन्यांची वाहने खराब रस्त्यावर अर्ध्या रस्त्यापर्यंत पार्किंग केल्या जातात. याबाबत स्थानिक शेतकरी आणि कामगारांनी मनसे तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांच्याकडे तक्रारी केल्या. रासकर यांनी या तक्रारीची दखल घेत संबंधित विभागाला निवेदन दिले आहे.
औद्योगिक वसाहतीमधील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या रस्त्यावर कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. इतर प्रवासी व शेतकऱ्यांचाही दळणवळण असते. हा रस्ता अतिशय खराब झाला असल्याने याठिकाणी अपघात होतात.
रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ३० दिवसांच्या आत हा रस्ता दुरुस्त केला नाही व रस्त्यांवर कंपनीच्या माल गाड्यांची पार्किंग हटवून त्या कंपनीच्या आत मध्ये पार्किंगची सोय केली नाही तर अहमदनगर नवनागापूर येथील कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी सहाय्यक अभियंता राहुल बळे, उपअभियंता संदीप बडगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.