अयोध्या / नगर सह्याद्री : आज आपले रामआले, प्रतिक्षा संपली. धैर्य, बलिदान, त्याग, तपस्या याचे फळ मिळाले. असे भावनिक उद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य, दिव्य भारत निर्माणाची शपथ उपस्थितांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य आणि ऐतिहासिक राम मंदिरात रामललांची विधीवत पूजा करण्यात आली. 500 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांची मूर्ती विराजमान झाली. पूजेवेळी गर्भगृहात पंतप्रधान मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल होते. श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठावेळी हेलिकॉप्टरधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
८४ सेकंदाच्या अभिजीत मुहूर्ताचे वैशिष्ट्य
जवळपास ५०० वर्षांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे. अयोध्येमध्ये राम मंदिराचं काम जवळपास ७० टक्के पूर्ण झालं असून आज गाभार्यात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आली. रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा खास असणार आहे. ८४ सेकंदाचा अभिजीत मुहूर्त आहे त्याच वेळेत ही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. हा मुहूर्त दुपारी १२ वाजून २९ मिनिटं ८ सेकंदला सुरू होऊन १२ वाजून ३० मिनट ३२ सेकंदांपर्यंत हा मुहूर्त असणार होता. याच अभिजीत मुहूर्तावर रामलल्लाची पूजा करण्यात आली. अभिजीत मुहूर्तादरम्यान प्रभू रामाचा अभिषेक केला. या अभिजीतच्या ८४ सेकंदात धार्मिक विधी पार पडले. हा मुहूर्त काशीचे अभ्यासक गणेशवर शास्त्री द्रविड यांनी हा मुहूर्त काढल्याची माहिती मिळाली.
अयोध्येचे राजे बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा भावूक होतात तेव्हा…
राम मंदिर साकार झाले. अनेक शतकांची प्रतीक्षा पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा विधिवत पूर्ण झाला. राम मंदिराचे लोकार्पण झाले. केवळ देशात नाही तर जगभरात हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या आयुष्यात राम मंदिर प्रत्यक्ष कधी पाहू शकेन, याचा विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया अयोध्येचे राजे बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांनी दिली. बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्यही आहेत.
रामलला प्राणप्रतिष्ठा आणि राम मंदिर यांमुळे अयोध्येने आपली गमावलेली भव्यता परत मिळवली आहे. रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. अयोध्या जगातील आघाडीचे पर्यटन स्थळ बनेल, असा विश्वास बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांनी व्यक्त केला. अयोध्या नीरस झाली होती. सीतामातेने अयोध्येला शाप दिला होता. मात्र, आता असे वाटते की, ही भूमी आता शापमुक्त झाली होती, असे मिश्रा यांनी यावेळी सांगितले.
नेपाळमधेही दिवाळी..प्रभू श्रीरामांशी खास कनेशन
भरताशेजारील देश असलेल्या नेपाळमध्येही रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव साजरा केला गेला. नेपाळमधील सिद्धार्थनगर आणि महाराजगंज जिल्ह्याजवळील नेपाळ सीमारेषेवर असलेल्या कृष्णानगर, मरजादपुर, चाकरचौडा, उडवलिया, बहादुरगंज, महाराजगंज, लुंबिनी, भैरहवा, नवलपरासी सह इतरही सीमाभागात प्रभू श्रीरामांचा जयघोष पाहायला मिळाला. येथील घरांवर प्रभू श्रीरामाच्या झेंड्यांनी व स्टीकरने घर व परिसर सजवण्यात आला होता. गल्लोगल्ली भगव्या पतायांनी परिसर सजला होता. येथील अनेक भागात एलईडी स्क्रीनवरुन प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. अनेक मंदिरात किर्तन, रामकथा आणि रामायण पुराणांचे वाचन होत आहे. नेपाळचे जनकपूर नगर हे प्रभू श्रीरामांची सासरवाडी आहे. म्हणूनच, नेपाळचे लोक अयोध्येला आपल्या मुलाचं घर मानतात.
लालकृष्ण अडवाणी, अमित शहा अयोध्येत अनुपस्थित
अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हजर नव्हते. अयोध्येमध्ये खूप थंडी आहे. त्यामुळे त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अडवाणी हे ९६ वर्षांचे आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील अयोध्येत आले नव्हते. ते आपल्या कुटुंबासोबत बिर्ला मंदिरात राम सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहत होते.
कंठ दाटला..ऊर भरून आला.. मोदींचा रामललासमोर साष्टांग दंडवत
अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आज १२ वाजून २९ मिनिटांनी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतयांच्या हस्ते ही साग्रसंगीत पूजा करण्यात आली. केवळ ४८ मिनिटांच्या मुहूर्ताच्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधीनंतर पंतप्रधान मोदींचा ऊर भरून आल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी रामाच्या या भव्य दिव्य लोभसवाण्या मूर्ती समोर साष्टांग प्राणाम केला.
मंदिर बांधणार्या हातांचा सन्मान, मोदींकडून मजुरांवर पुष्पवृष्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि राम मंदिराचे झाले. राम मंदिर सोहळ्याला उपस्थित असलेल्यांना संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधकामात सहभागी असलेल्या मजुरांचा सन्मान केला. मजुरांवर पुष्पवृष्टी केली.