जामखेड / नगर सह्याद्री :
मी जामखेडचा भाई आहे, तुला दुकान चालवायचे असेल तर मला महिन्याला दहा हजार रुपये हप्ता दे, पोलीसांना सांगितले तर तुझे दुकान जाळून टाकेल असे म्हणुन फिर्यादीच्या खिशातील तीन हजार रुपये बळजबरीने काढुन घेतले. तसेच हातातील चाकूने फिर्यादीच्या गळ्यावर मारण्याचा प्रयत्न करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी एका गावगुंडाने दिली. ही कसली दहशत? कायदा व सुव्यवस्था ढासळली का असाच प्रश्न जामखेड मधिल नागरिकांना पडला आहे. सध्या जामखेड मध्ये कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा नऊ बारा झाले आहेत. त्यामुळे शहरातील नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .
प्रताप (उर्फ) बाळू हनुमंत पवार (रा. सारोळा ता. जामखेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी दुकान मालक सुरज शिवाजी जाधव (रा. खांडवी ता. जामखेड) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की मी माझ्या कुटुंबासमवेत तालुक्यातील खांडवी या ठिकाणी रहात आहे. माझे जामखेड शहरातील खर्डा चौक याठिकाणी सोन्याचे दुकान आहे. दि ३० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता माझे नातेवाईक अनिल पवार व मी आमच्या दुकानात बसलो होतो.
यावेळी त्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचा आरोपी प्रताप उर्फ बाळू हनुमंत पवार (रा.सारोळा ता.जामखेड) हा माझ्या दुकानात आला व मला म्हणाला की दुकान सुरू ठेवायचे असेल तर मला दर महीन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. तेंव्हा मी त्याला देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने मला शिवीगाळ करून म्हणाला की तुला माहित नाही. मी जामखेडचा भाई आहे. असे म्हणुन मला मारहाण केली व त्याच्या कंबरेला असलेला धारधार चाकु काढुन माझ्या गळ्याच्या दिशेने फीरवला मात्र मी तो वार खाली वाकून हुकवला. नंतर त्याने अत्ता चे अत्ता दहा हजार रुपये दे असे म्हणत खिशातील तीन हजार रुपये बळजबरीने काढुन घेतले.
तसेच तु जर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तर तुला जीवे मारुन टाकेल. तुझे ज्वेलर्स चे दुकान पेटवून देईल अशी धमकी दिली. वाद सोडवण्यासाठी फिर्यादी जाधव यांचे नातेवाईक अनिल पवार हा आला असता त्याला देखील शिवीगाळ केली. आरोपी बाळु पवार एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दुकानाबाहेर येऊन हातातील चाकु हवेत फिरवत आरडाओरड करून दहशत पसरवली. त्यामुळे घाबरुन परीसरातील काही दुकानदारांनी आपल्या दुकानाचे शटर खाली ओढले होते. तसेच रस्त्यावरील लोक घाबरून त्या ठिकाणाहून पळुन गेले.
कायदा व सुव्यवस्था ढासळली?
गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी बाळु पवार याने अनेक वेळा जामखेड शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भरदिवसा खंडणी मागितली जाते तसेच अनेक वेळा शहरात हाणामारी चे देखील प्रकार घडले आहेत. त्यामुळे जामखेड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थचे तीन तेरा व नऊ बारा वाजले आहे का? असाच प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला असुन नागरिकात यामुळे भिती युक्त वातावरण निर्माण झाले आहे.