अहमदनगर। नगर सहयाद्री
महाविद्यालयीन तरूण-तरूणींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार्या तीन कॅफेवर नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने छापेमारी केली. तीन वेगवेगळ्या फिर्यादीवरून चौघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
सावेडी गावातील पंम्पींग स्टेशन रस्त्यावरील आर्गनो कॅफेवर पथकाने छापा टाकला असता तरूण-तरूणी अश्लिल चाळे करताना आढळले. त्यांना तोंडी समज देऊन सोडले. कॅफेचा मालक अविनाश विलास ताठे (रा. पंम्पींग स्टेशन रस्ता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने बालिकाश्रम रस्त्यावरील गंधे मळ्यातील गोल्डन कॅफेवर छापा टाकला असता तेथेही हेच दृष्य समोर आले. त्यांनाही तोंडी समज देऊन सोडण्यात आले.
कॅफेचा मालक सार्थक अनिल गंधे (रा. बालिकाश्रम रस्ता) व एका कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पाइपलाइन रस्त्यावरील श्रीराम चौकात लव्हबर्ड कॅफेवर पथकाने छापा टाकला असता तेथेही महाविद्यालयीन तरूण- तरूणी अश्लिल चाळे करताना आढळले.
त्यांना तोंडी समज देऊन सोडल्यानंतर कॅफे चालक ऋषीकेश सखाराम निर्मळ (रा. झोपडी कॅन्टींग) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपअधीक्षक भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुयोग सुपेकर, संतोष ओव्हाळ, गणेश चव्हाण, सचिन जाधव, हेमंत खंडागळे, सचिन मिरपगार, सागर द्वारके यांच्या पथकाने ही कारवाई केली.