spot_img
अहमदनगरअजित पवारांच्या नाकावर टिच्चून लंकेंनी तुतारी फुंकली !!

अजित पवारांच्या नाकावर टिच्चून लंकेंनी तुतारी फुंकली !!

spot_img

| नगरच्या महानाट्यात देवेंद्र फडणवीसांना ठरवले गेले अनाजी पंत
| सत्तेचा लाभ उठवत अजित पवार यांना सोडचिठ्ठी देणारे राज्यातील पहिले आमदार ठरणार
सारिपाट / शिवाजी शिर्के
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या आठवड्यात जाहीर होईल. मात्र, त्याआधीच नगरमध्ये महानाट्य रंगले आहे. आ. निलेश लंके यांच्या पुढाकाराने नगर शहरात खा. अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असणारे ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. महानाट्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी हजेरी लावली. त्याहीपेक्षा चर्चा ठरली ती या महानाट्याला हजेरी लावणार्‍या विखे विरोधकांची! छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत हे महानाट्य असले तरी चर्चा रंगलीय ती लंके यांच्या लोकसभेसाठीच्या उमेदवारीची! अजित पवार यांच्या खास गोटात जाऊनही त्यांना सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाण्याची आता लंके यांची फक्त औपचारीकता बाकी आहे. महानाट्यात देवेंद्र फडणवीस यांचा शेलक्या विशषणांनी धिक्कार करण्यात आल्यानंतर सर्वात मोठी अडचण झालीय ती आ. राम शिंदे यांची! अजित पवार यांच्या माध्यमातून स्वत:सह कार्यकर्त्यांची अडचणीतील कामे मार्गी लावत मतदारसंघासाठी निधी मिळविणारणे निलेश लंके हे आता अजित पवार यांची साथ सोडणारे पहिले आमदार ठरणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाच्या बैठकांचा सिलसीला सध्या जोरात चालू आहे. राज्यातील कोणते मतदारसंघ कोणाच्या वाट्याला हे अद्यापही नक्की झालेले नाही. मात्र, नगर लोकसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपाच्या वाट्याला असणार हे नक्की! या मतदारसंघातून भाजपाचे डॉ. सुजय विखे हे विद्यमान खासदार आहेत. पाच वर्षात केलेली कामे आणि जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. विखे यांच्याशिवाय या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असणार्‍यांमध्ये पहिले नाव घेतले जाते ते आ. प्रा. राम शिंदे यांचे! देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये स्थान असणारे राम शिंदे हे सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघ हे त्यांचे कार्यक्षेत्र! आता विधान परिषदेत असले तरी याच मतदारसंघात त्यांचे लक्ष! आधीच्या सरकारमध्ये नगरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केले असले तरी त्यांच्या कामकाज पद्धतीबाबत भाजपाच्याच गोटात त्यावेळी मोठी नाराजी निर्माण झाली होती.

‘कलेक्शन’च्या कार्यकर्त्यांचे कोंडाळे आणि त्यातून भाजपाच्या निष्ठावानांना देखील मिळालेली अपमानास्पद वागणूक! स्वत:च्या मतदारसंघात टक्केवारीचा झालेला आरोप, तुटलेला संपर्क आणि अनेकांना मिळालेली अपमानास्पद वागणूक त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे ते स्वत:च सांगत आहेत आणि दुसरीकडे संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवार असणार्‍या पवार गटाच्या निलेश लंके यांचे कौतुकही ते करताना दिसतात! आता त्याच लंके व त्यांच्या समर्थकांनी शिंदे ज्यांचे नेतृत्व मानतात ते देवेंद्र फडणवीस यांना शेलक्य विशेषणांनी हिणवण्यास प्रारंभ केलाय! काहीच कारण नसताना ज्या लंके यांना डोक्यावर घेतले त्याच लंके व त्यांच्या समर्थकांमुळे आता राम शिंदे हे अडचणीत आले आहेत.

महाविकास आघाडीत नगर मतदारसंघ शरद पवार गटाकडेच राहणार आहे. पवार गटाकडून चर्चेत आलेली नावे पाहता ती फक्त चर्चेसाठीच असल्याचे स्पष्ट आहे. प्राजक्त तनपुरे, रोहीत पवार, दादा कळमकर यांचा लोकसभा मतदारसंघ हा आवाकाच नाही! जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी स्वत:च फक्त पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा निर्णय जाहीर केलाय! याचाच अर्थ पवार गटाकडे येथे अद्यापतरी उमेदवार नाही. अजित पवार यांच्या गोटात असणार्‍या निलेश लंके यांच्यावर शरद पवार गटाची सध्यातरी भिस्त आहे. लंके व त्यांच्या समर्थकांची मानसिकता भाजपासोबत राहण्याची कधीच राहिली नाही. अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय निलेश लंके यांनी घेतला. मात्र, त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी नगरमध्ये सातत्याने भाजपा विरोधी भूमिका घेतली. अनेकदा जाहीरपणे मोदी- फडणवीस यांच्यावर जहरी टिका केली.

निलेश लंके समर्थकांनी सातत्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून मोदी- फडणवीस कसे हुकुमशहा आहेत आणि त्यांच्यामुळे देश किती रसातळाला गेलाय हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न केला. हे सारे होत असताना त्याच फडणवीस यांचे खंदे समर्थक समजले जाणारे राम शिंदे हे त्याच निलेश लंके यांचे सारथ्य करण्यात धन्यता मानत आले. खरेतर राम शिंदे यांचे दुखणे कर्जत- जामखेड मतदारसंघ! या दोन तालुक्यांच्या बाहेर राम शिंदे यांचा फारसा अवाका नाही. पालकमंत्री असतानाही त्यांनी आपल्या मतदारसंघा बाहेर कधी लक्ष घातले नाही.

नगर शहरात हाताच्या बोटावर मोजण्या इतपत कार्यकर्त्यांचा संग्रह! त्यातही यातील काही नावे ‘कलेक्शन’शी संबंधीत! शत्रुचा शत्रू तो आपला मित्र, यानुसार राम शिंदे हे लंके यांचे सारथ्य करत राहिले. त्यातून शिंदे यांच्या पदरी काहीच पडले नाही. उलटपक्षी शिंदे ज्यांचे नेतृत्व मानत आले आणि ज्यांच्यामुळे शिंदे यांना विधान परिषद मिळाली त्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निलेश लंके व समर्थकांनी सातत्याने तुतारी वाजवली! लंके यांचे इप्सीत साध्य झाले असे मानले तर शिंदे यांच्या पदरात काय पडले असा प्रश्न आहेच! लंके व त्यांच्या समर्थकांकडून मोदी- फडणवीस यांच्यावर सातत्याने झालेली आणि कालच्या महानाट्यात झालेली शेरेबाजी पाहता या प्रश्नाचे उत्तर आता दस्तुरखुद्द राम शिंदे यांनाच द्यावेच लागणार आहे.

लोकसभेची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागू शकते. त्याआधी निलेश लंके हे शरद पवार यांच्या गोटात दाखल होतील आणि तुतारी फुंकतील! शरद पवार गटाकडून स्वत: निलेश लंके यांच्या उमेदवारीसाठी चर्चा आहे. लंके हे त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्यासाठी आग्रही आहेत. काहीही झाले तरी लंके पती- पत्नींपैकी कोणीतरी एकजण शरद पवार गटाचा उमेदवार असणार आहे. म्हणजेच शरद पवार गटाकडून सध्या उमेदवार जाहीर न करण्यामागचे कारण स्पष्ट आहे. अजित पवार यांचा राज्यातील राजकारणात मोठा दबदबा आहे.

त्यांच्यासोबत गेलेला अथवा त्यांना शब्द दिलेला एकही आमदार अद्यापतरी माघारी म्हणजेच शरद पवार यांच्या गोटात आलेला नाही. मात्र, निलेश लंके हे त्याला अपवाद ठरणार आहेत. ‘राजकारणात पर्याय ठेवावा लागतो’, असं जाहीरपणे बोलणार्‍या निलेश लंके यांनी अजित पवार यांना देखील शरद पवार हा आपला पर्याय असल्याचे ठणकावून सांगितल्यात जमा आहे. निलेश लंके यांच्या सोडून जाण्याने अजित पवार हे नक्कीच घायाळ होतील! अर्थात, अजित पवार याविषयावर काहीच रिअ‍ॅक्ट झाले नाही तर त्याचे अर्थ बरेच निघणार आहेत. दोन्ही पवारांनी मिळून लंके यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम केल्याची पहिली प्रतिक्रीया आल्यास आश्चर्य वाटू नये!

निलेश लंके यांचे दोन्ही पवारांकडे अ‍ॅफेडेव्हीट; म्हणूनच शरद पवारांकडे जाण्याचा मार्ग मोकळा!
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर कोणाकडे किती आमदार आहेत याची मोजदाद झाली. त्यासाठी आमदारांचे प्रतिज्ञापत्र घेण्यात आली. नगर जिल्ह्यातील संग्राम जगताप यांनी सर्वात आधी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तसे प्रतिज्ञापत्र दिलेे. हाच निर्णय कोपरगावचे आशुतोष काळे यांनी घेतला. प्राजक्त तनपुरे व रोहीत पवार यांनी शरद पवार गटासाठी प्रतिज्ञापत्र दिले. अकोेल्याचे लहामटे आणि पारनेरचे लंके या दोघांनी दोन्ही पवारांना स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दिले. दोन्ही पवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या राज्यातील आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये लहामटे आणि लंके यांच्या अ‍ॅफीडेव्हीटचा समावेश आहे. याचाच अर्थ लहामटे आणि लंके या दोघांनी शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही समर्थन असल्याचे लिहून दिले. त्यामुळेच निलेश लंके यांनी दोन- चार दिवसात शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला तरी आश्चर्य वाटू नये!

फडणवीस समर्थक राम शिंदे यांनाही लंके समर्थकांनी पाडले गेले तोंडघशी
स्थानिक गटबाजीतून गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने विखे यांच्या विरोधात भूमिका घेणारे विधान परिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले. हे सारे सांगत असताना त्यांनी विखे यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतली आणि विखे विरोधक म्हणून ओळख असलेल्या निलेश लंके यांना साथ दिली. लंके यांच्या व्यासपीठावर जात राम शिंदे यांनी त्यांचे कौतुकही केले. आता त्याच आ. लंके यांच्या समर्थकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतली जात आहे. महानाट्याच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली आणि त्यांचा नामोल्लेख थेट टरबुज्या म्हणून झाला. त्यावेळी झालेल्या टाळ्या आणि शिट्यांना निलेश लंके यांनी स्मीतहास्याने प्रोत्साहन दिले. लंके यांना पाठबळ देणार्‍या राम शिंदे यांना तोंडघशी पडावे लागल्याची चर्चा लागलीच सुरु झाली.

नरेंद्र मोदी- फडणवीसांविरोधात शेरेबाजी संघ-भाजपच्या जिव्हारी!
महानाट्याकडे राजकीय दृष्टीकोनातून कोणी पाहू नये असे आवाहन केले गेले. मात्र, प्रत्यक्षात या महानाट्यात पंतप्रंधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात व्हीव्हीआयपी कक्षातून शेरेबाजी झाली. ही शेरेबाजी करताना अनाजीपंत, टरबुज्या अशी शेलकी विशेषणे लावण्यात आली. संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जनतेसमोर यायलाच हवा, मात्र हे करताना नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील ही शेरेबाजी कशासाठी असा सवाल आता भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांसह संघ परिवारातून उपस्थित केला जात आहे.

फडणवीसांना टरबुजे म्हणताच, निलेश लंकेंच्या चेहर्‍यावर हसू!
शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या माध्यमातून लोकसभेच्या मैदानात उतरण्यास सज्ज झालेल्या अजित पवार गटातील निलेश लंके यांच्या समर्थकांनी महानाट्यात अनाजी पंत यांचा नामोल्लेख येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या! घोषणानाट्य येथेच थांबले नाही! टरबुज्या… अनाजीपंत…. याला फासावर लटकवा…. अशा घोषणाही यावेळी लंके समर्थकांनी दिल्या! ही घोषणाबाजी चालू असताना पहिल्या रांगेत बसलेल्या आ. निलेश लंके व राणी लंके यांच्या चेहर्‍यावरील हसू लपून राहिले नाही. अजित पवार गटात राहून भाजपासोबतच्या सत्तेत सहभागी असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील घोषणाबाजी आता चर्चेत आली आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...