अहमदनगर | नगर सह्याद्री
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. खासदारांच्या साखर वाटपाने गुरु चेल्याची साखर वाढली असून त्यांच्या गलिच्छ राजकारणाने शहराचे वातावरण बिघडत आहे असा घणाघात करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी किरण काळे यांच्यासह आ. बाळासाहेब थोरात यांच्यावरही निशाणा साधला.
हर्षद चावला यांच्यावर हल्ला झाला होता. काळे व खोसे यांच्या आरोप प्रत्यारोपानंतर खोसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काळे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी उपस्थित होते. खोसे म्हणाले, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षाची निवड करुन शहरात काँग्रेस संपविण्याचे षडयंत्र केले. त्या पदाधिकार्याने शहरात उरली-सुरली काँग्रेस संपविण्याचे काम सुरु केले आहे.
शहराचा कळवळा दाखविणार्या माजी महसूल मंत्री यांनी शहरासाठी काय योगदान दिले? कोणते विकासात्मक कामे त्यांनी केली. नगरकरांना एकही त्यांचे काम आठवणार नाही. शहराच्या युवकांच्या रोजगार निर्मितीसाठी काय योगदान दिले? असल्याचा प्रश्न त्यांनी मांडला. काँग्रेसचा तो पदाधिकारी रोजगार निर्मितीची भाषा करतो. मात्र तो स्वतः बेरोजगार असून, रोजगाराचे साधन म्हणून त्याने राजकारणाची निवड केली आहे.
विविध शासकीय कार्यालयात जाऊन अर्ज, निवेदन देऊन अधिकार्यांना ब्लॅकमेल करून त्याचे उदरनिर्वाह सुरु आहे. अनेक वर्षापासून त्याचे प्रताप सुरू आहेत असा आरोप खोसे यांनी केला. तसेच खासदारांनी शहरात सुरु केलेल्या साखर वाटपाने तो पदाधिकारी व त्याच्या नेत्याची शुगर वाढली आहे असा घाणाघातही केला.