अहमदनगर | नगर सह्याद्री
गेल्या पंधरा वर्षांपासून विविध १८ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या कुख्यात गुंड विजय पठारे याला तोफखाना पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा व घराझडतीसाठी शहरातून बेड्या टाकून पायी फिरवले. निलक्रांती चौकापासून पठारे याची दहशत असलेल्या बालिकाश्रम रस्ता व सिद्धार्थनगर परिसरात त्याला पायी फिरवत घरापर्यंत नेले. तेथे पोलिसांनी घरझडती घेऊन कोयता जप्त केला. दरम्यान, पठारे हा तीन दिवसांपूर्वी घडलेल्या हाणामारीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे.
तीन दिवसांपूर्वी निलक्रांती चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विजय पठारे याने गाणे लावण्यावरून व फोटो लावण्यावरून गोंधळ घातला. यातून दोन गटात हाणामारी होऊन कोयत्याने हल्ला करण्यात आला. या प्रकरणात पठारे याच्यासह सहा ते आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. सोमवारी सायंकाळी तपासावेळी पोलिसांनी पठारे याला घटनास्थळी नेले.
तेथून त्याच्या सिद्धार्थनगर येथील घरापर्यंत त्याला पायी नेले. घरात झडती घेऊन कोयता जप्त करण्यात आला. यावेळी रस्त्यावर व सिद्धार्थनगर परिसरात मोठी गर्दी झाली होती. निलक्रांती चौक, बालिकाश्रम रस्ता व सिद्धार्थनगर परिसरात पठारे याची दहशत आहे. त्यामुळेच पोलिसांनी त्याला या भागातून बेड्या घातलेल्या अवस्थेत पायी फिरवले. त्याच्यावर कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.