शिर्डी / नगर सह्याद्री : शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय शिबीर आहे. याची आज सुरवात झाली. अजित पवार यांच्या बंडानंतर हे सुरु असणार शिबीर महत्वपूर्ण मानले जात आहे. परंतु यात आमदार रोहित पवार अनुपस्थित राहिले अन तर्क-वितर्कांना उधाण आले. आता या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आ.रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहीत खुलासा केला आहे.
रोहित पवारांनी या शिबिरातील अनुपस्थितीचं कारण दिल आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्याने शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चाही झाली आहे. याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये,
” असं आवाहन रोहित पवारांनी केलं आहे. तसंच “आम्ही सर्वजण सोबत असून आदरणीय शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू,” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
शिबिराला कोण कोण होते उपस्थित?
या शिबिराला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष हेमंत टकले, राज्यसभा खासदार फौजिया खान, आमदार अनिल देशमुख, आमदार अशोक पवार, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अरुण लाड, आमदार संदीप क्षीरसागर, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आदींसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित आहेत.