अहमदनगर / नगर सह्याद्री : राहुरी मधील ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याची हत्या झाली होती. या हत्येने जिल्हाभर खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत २४ तासात खुनी पकडले आहेत. किरण दुशींग त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (वय 23 वर्षे, रा. येवले आखाडा, ता.राहुरी), शुभम संजीत महाडिक (वय 25 वर्षे, रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी, ता.राहुरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (वय 20 वर्षे, रा.उंबरे, ता.राहुरी) यांना ताब्यात घेतले आहे.
25 जानेवारीला राजाराम जयवंत आढाव व मनिषा राजाराम आढाव हे राहत्या घरातून कोर्टात गेले होते. परंतु नंतर त्यांचा काही संपर्क होऊ न शकल्याने लता राजेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिसिंग दाखल केली होती. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आढाव वकिल दांम्पत्याचा शोध घेणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेस सूचित केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व वकिल दांम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकिलपत्र आहेत याबाबत माहिती घेत तपासाची चक्रे फिरवली. राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयीत कार दिवसा व रात्रीचे वेळी गेल्याचे त्यांना दिसले. संशयीत कार किरण दुशींग वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंगयास ताब्यात घेत सखोल व बारकाईने तपास करता त्याने मागील काही
दिवसापासुन त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजीत महाडिक, हर्षल दत्तात्रय ढोकणे, बबन सुनिल मोरे आदींसह कट केला. वकिल दांम्पत्याला कोर्ट केसच्या कामकाजाकरीता बोलवले. त्यानंतर त्यांना किरण दुशींग याने स्वत:चे गाडीत बसवून वकिल दांम्पत्यांचे घरी घेऊन गेला. घरामध्ये दोघांचे हात पाय बांधून 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली. परंतु वकिल दांम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच घरामध्ये 5 ते 6 तास त्यांचा छळ केला. त्यानंतर त्यांना वकिल दांम्पत्याचे गाडीमध्ये बसवून त्यांना मानोरी गावाच्या बाहेर नेऊन खून केला. त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभुमीचे जवळ असलेल्या विहीरीमध्ये टाकले अशी माहिती त्याने दिली. किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर खून, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.