श्रीगोंदे / नगर सह्याद्री : अवकाळी पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला. श्रीगोंदा तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
मजुरांच्या अभावी तसेच रब्बी पिकांच्या लागवडीमुळे शेतकरी विविध कामात व्यस्त आहेत. त्यामुळे कपाशी वेचणीचे कामे मागे पडले. अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीला बोंडे तशीच आहे. परंतु अचानक अवकाळी आल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्याला फटका बसला आहे.
वेचणी अभावी शेतामध्ये राहिलेला कापूस अवकाळी पावसाच्या पाण्यामध्ये पिवळा पडण्यास सुरुवात झाली. या कापसाला बाजारामध्ये कमी भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचण निर्माण होणार आहे. तर दुसरीकडे शेतात असलेला कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.
खर्चाच्या तुलनेत नफा नाही
१०००-१५०० रुपये किमतीचे बियाणे, शेतीची नांगरट, कपाशी लागवडसाठी सरी पाडणे, उगवण्याची क्षमता कमी झाल्याने फेर लागवड, दाणेदार खते, कीटकनाशकांची फवारणी, खुरपणी, कापूस वेचणी, साठवणूक आणि विक्री अशा अनेक प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक खर्च झाला. एकरी आठ ते दहा हजार खर्चून त्यात अवकाळी दुष्काळी संकटांना तोंड देत हाती काहीच राहत नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.
बाजार भाव नाही
अस्मानी संकट शेतकऱ्यांना नवीन नाही. मात्र चालू वर्षी आधीच खरिपात पावसाने दांडी दिल्याने कपाशीचे उत्पन्न घटले. त्यात कपाशीला गेल्यावर्षीच्या तुलनेत दर नाही. त्यात आता अवकाळी पावसाने झाडाला असलेल्या कापसाच्या वाती झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. सरकारने लवकरात लवकर शेतकरी हितार्थ निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.