‘नगररचना विभागात २२१ प्रकरणे प्रलंबित’
अहमदनगर | नगर सह्याद्री-
महापालिकेच्या नगररचना विभागात कर्मचार्यांकडे अनेक दिवसांपासून तब्बल २२१ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी नगररचना विभागातील अडवणूक व भ्रष्टाचाराची पोलखोल करत कर्मचार्यांवर गंभीर आरोप केले.
आयुक्त पंकज जावळे यांनी कर्मचार्यांकडे प्रलंबित प्रकरणांची माहिती मागवली आहे. अडवणूक करणार्या कर्मचार्यांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्त जावळे यांनी सांगितले.नगररचना विभागात अधिकार्यांऐवजी कर्मचारी प्रकरणे अडवतात, एकेका मंजुरीसाठी दोन लाख रुपये मागतात, अशा तक्रारी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर व नगरसेवक कुमार वाकळे यांनी केल्या होत्या. नगरसेवकांनाही पैसे देऊन कामे करून घ्यावी लागतात. नगरसेवकांनी फोन केला, तर कर्मचारी वाढीव पैसे लागतील, असा दम नागरिकांना देतात, असे आरोप सभेत केले होते.
अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे नगररचना विभागातच ठाण मांडून आहेत.त्यांच्या बदल्या का होत नाही, असा सवाल नगरसेवकांनी केला. यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला. या विषयावरून महापालिकेची मोठी बदनामी झाल्याने आयुक्त जावळे यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यासाठी त्यांनी कर्मचार्यांकडे छाननीसाठी प्रलंबित प्रकरणांची माहिती मागवली आहे. यात कर्मचार्यांनी अनेक दिवसांपासून २२१ प्रकरणे अडवून ठेवल्याचे समोर आले आहे. त्यावर आयुक्त काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.