पारनेर / नगर सह्याद्री : पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील शेकडो वृद्धांचे संजय गांधी निराधार योजनेसह श्रावण बाळ व इतर योजनेचे अनुदान बंद झाले आहे. यासंबंधी तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करूनही अनुदान सुरु न झाल्याने अखेर त्यांनी तहसील कार्यालयासमोरच बुधवारी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पिंपरी जलसेन येथील या वृद्धांच्या उपोषणाला शिवसेनेचे तालुकाप्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे व माजी सरपंच सतीश पिंपरकर यांनी पाठिंबा दिला असून माझ्यासमोर अशरफ बाबुभाई शेख यांना तहसीलदारांनी आरेरावी व अपमान स्पद वागणूक दिले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या संबंधीची तक्रार संबंधित वृद्धांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. परंतु पारनेर तहसील कार्यालयातून खोटी माहिती महसूलमंत्र्यांना पुरवली असल्याचा आरोपही वृद्धांनी यावेळी केला. उपोषणात अशरफ शेख यांच्यासह पारूबाई वाढवणे, शिवाजी बोरुडे, बाबाजी थोरात, दत्तात्रय घेमुड, हौसाबाई कदम, गुलाब थोरात, सुमन कदम, लक्ष्मण कदम, गंगाराम शेळके, सीताबाई काळे, सुनंदा शेळके यांचा समावेश आहे. यासंबंधीची निवेदन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठ व संबंधित विभागांना देण्यात आले असून तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या वृद्ध लाभार्थ्यांनी केली आहे. निवेदनात लाभार्थ्यांनी म्हटले आहे की, पारनेर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ निराधार योजनेतील अनुदान कोणतेही कारण न देता बंद करण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरा पासून संजय गांधी निराधार योजनेत श्रावण बाळात १ हजार रुपयांचे अनुदान या वृद्धांच्या खात्यावरून आल्याने त्यांच्या औषध पाण्यासह इतर खर्चाची परवड झाली आहे. तर यासंबंधी माहिती अधिकारात अशरफ बाबुभाई शेख यांनी अर्ज दाखल केला. अर्जासाठी लागणारी रक्कम ११२ रुपये सुद्धा सेंट्रल बँक ऑफ इंडिया तहसील कार्यालयाच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे.
परंतु पारनेर तहसील कार्यालयाने माहिती अधिकाराची माहिती दिली आहे त्यामध्ये कोणतेही सबळ असे कारण या योजनेचे अनुदान बंद करण्यासाठी देण्यात आले नाही. त्यामुळे ज्येष्ठांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या व अनुदान बंद करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी पिंपरी जलसेन येथील वृद्धांनी केली आहे.
न्याय न मिळाल्यास आत्मदहन
मागील आठ ते नऊ वर्षापासून पारनेर तहसील कार्यालयाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मला अनुदान सुरु आहे. परंतु वयाचे खोटे कारण देत हे अनुदान बंद करण्यात आले. दुसरीकडे यासंबंधी तहसीलदार गायत्री सौंदाणे यांना प्रश्न मांडण्यासाठी गेले असता त्यांनी मला अपमानास्पद वागणूक देऊन शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या समोर त्यांच्या दालनातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही व आमचे अनुदान सुरु होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय या वृद्धांनी घेतला असून न्याय मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा उपोषणकर्ते वृद्ध अशरफ बाबूलाल शेख यांनी दिला आहे.