अहमदनगर / नगर सह्याद्री : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा यासाठी आंबेडकरी समाजाने २५ वर्ष न्यायालयीन प्रक्रिया लढवली. याला आता यश आले आहे. आता २० जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होईल अशी माहिती आ.संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कृती समितीचे नेते अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, अजय साळवे, अतिरिक्त आयुक्त डॉ,प्रदीप पठारे, माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे,शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, इंजि. श्रीकांत निंबाळकर आदी उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप पुढे बोलताना म्हणाले, शहरात उभारण्यात येत असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा वारसा तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचे काम होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून दिशा दिली. त्यांचे विचार समाजासमोर यावे यासाठी त्यांचा नगर शहरात भव्य पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे, माजी नगराध्यक्ष अरुणकाका जगताप हे नगराध्यक्ष असताना शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण केले,
मागील काळात त्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांच्या तक्रारीमुळे ते काम मार्गी लागले नाही. मात्र आता स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल.
विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्याच धर्तीवर नगर महापालिकेत पुतळा उभारण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात येणार आहेत. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचाही पूर्णाकृती पुतळा शहरात उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉ. आंबेडकर यांच्या उभारण्यात आलेल्या पुतळ्यानंतर त्या पुतळ्याची प्रतिकृती नगर शहरात उभारण्यात येत आहे. या पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची १८ फूट असून पुतळा १० फुटाचा असून एकूण २८ फुटाचा भव्यदिव्य पुतळा असणार आहे, तसेच येत्या ६ महिन्यात या पुतळ्याचे काम पूर्ण होणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.