अहमदनगर / नगर सह्याद्री : श्रीराम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोध्या येथे दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांना या सोहळ्याचे निमंत्रण असल्यामुळे आज दिनांक २० जानेवारी रोजी आदर्श गाव हिवरे बाजार परिवारातर्फे पोपटराव पवार यांचा सत्कार व शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रसंगी बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन ही रामराज्याची संकल्पना आहे. या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण म्हणजे प्रभू रामचंद्राना अपेक्षित असलेल्या रामराज्याचा एक अंश म्हणून आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये काम करायला मिळाले.
त्रेतायुगात माणूस हा सर्वात जास्त आयुष्मान होता. श्रीरामाकडे सर्वकाही असूनही जीवन निसर्गामध्ये वनवासी समाजात व्यथित केले. आयुर्वेद आणि योगा तेथेच सर्वात जास्त प्रभावी होते म्हणून आयुष्यमान जास्त होते. केवट हा कोळी समाजाचा होता व उष्टे बोर खाणारी शबरी हि भिल्ल समाजाची होती. यावरून त्याच्याकडे असणारी सर्वधर्मसमभाव लक्षात येते. श्रीरामांनी १४ वर्षाचा वनवासाचा कालखंड नद्या,वन्यजीव,माती यात घातला. म्हणून हिवरे बाजारने वने,पाणी,वन्यजीव हीच प्रेरणा घेऊन रामराज्य साकार केले.
याप्रसंगी विमलताई ठाणगे सरपंच हिवरे बाजार, छबूराव ठाणगे चेअरमन, रामभाऊ चत्तर व्हा.चेअरमन, बाबासाहेब गुंजाळ ,हरिभाऊ ठाणगे, दामोधर ठाणगे, अर्जुन पवार, रोहिदास पादीर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.