लोणी / नगर सह्याद्री : मित्रांसोबत घराबाहेर खेळण्यासाठी गेलेल्या चिमुरड्यावर बिबट्याने झडप घातली. या हल्यात त्याचा मृत्यू झाला आहे. अथर्व प्रवीण लहामगे असे या नऊ वर्षीय मुलाचे नाव आहे. तो लोणी बुद्रुक (ता.राहाता) येथील रहिवासी आहे. हे घटना रविवारी (ता.१४) सायंकाळी उशिरा घडली.
अधिक माहिती अशी : लोणी बुद्रुक येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोरील गोसावी वस्तीवर लहामगे कुटुंबीय राहत असून गणेश व अथर्व हे दोघे जण दूध आणण्यासाठी गेले व दूध घेऊन परत आले. घरी आल्यानंतर गणेश दूध ठेवण्यास घरात गेला. त्याने बाहेर येऊन पाहिले असता त्याला अथर्व दिसला नाही. अथर्व त्याच्या घरी गेला असावा, असे गणेशला वाटले. अथर्व घरी न आल्यामुळे घरच्यांनी संदीप गोसावी यांच्याशी संपर्क केला.
‘अथर्व घरी जाऊन बराच वेळ झाल्याचे गोसावी कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे लहामगे परिवाराने व परिसरातील रहिवाशांच्या मदतीने अथर्वची शोधाशोध सुरू केली. संदीप गोसावी यांच्या मकाच्या शेताच्या मध्यभागी जखमी अवस्थेत पडलेला अथर्व रात्री साडेदहाच्या सुमारास आढळला. त्याच्या गळ्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली होती. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला होता. या जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अथर्वला मृत घोषित केले.
पालकमंत्री विखेंकडून भेट घेत सांत्वन
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी (ता.१५) सायंकाळी लहामगे कुटुंबीयांची भेट घेतली. घटनास्थळाची पाहणी केली व कुटुंबियांचे सात्वंन केले. कुटुंबीयांना शासननिर्देशानुसार २५ लाख रुपयांची मदत मिळेल असेही सांगितले.