अहमदनगर। नगर सहयाद्री-
मेव्हण्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि. ५) पहाटे नगर-मनमाड रस्त्यावरील मेघनंद हॉटेलसमोर घडली. अमित राजू करमाकर (वय २६ रा. बालिकाश्रम रस्ता) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल दशरथ शिंदे (रा. कॉटेज कॉर्नर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अमित व त्यांचे दाजी अमोल यांच्यात किरकोळ वाद होत असत. शुक्रवारी अमित व त्यांची पत्नी प्रतिभा बोल्हेगाव येथील शाम कदम यांच्याकडे जात असताना मेघनंद हॉटेलसमोर बस स्टॉप शेजारी त्यांना अमोल याने थांबवून विनाकारण शिवीगाळ, दमदाटी केली.
तावडीत सापडला असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अमित यांनी काय झाले, अशी विचारणा केली असता त्याने लोखंडी कोयत्याने डाव्या हातावर मारून जखमी केले. भांडण सोडविण्यास आलेल्या अमितची पत्नी प्रतिभा यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तू माझे नादी लागला तर तुला ठार मारीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.