अहमदनगर / नगर सह्याद्री : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून संपूर्ण महाराष्ट्रामधील वातावरण तापले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही आरक्षण मागणीची धार तीव्र होत चालली आहे.
जिल्हाभरातील बहुतांश गावांनी आक्रमक होत आरक्षण मिळेपर्यंत खासदार-आमदारांसह सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. साखळी उपोषण, मशाल मोर्चा काढत मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला जात आहे.
जिल्हाभरात नेतेमंडळींना प्रवेशबंदी
गावोगावी साखळी उपोषण, राजकीय नेत्यांना गावबंदी, राजकीय सभा, कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. भातोडी, पारगाव, जेऊर, इमामपूर, वाळकी, पिंपळगाव उज्जनी, मदडगाव, राळेगण म्हसोबा, टाकळी काझी, खडकी, पारेवाडी, वाकोडी, सांडवे, दशमी गव्हाण, बहिरवाडी, चास, कामरगाव, भोरवाडी, भोयरे पठार, कौडगाव, अकोळनेर आदी गावांसह जिल्ह्यातील बहुतांश गावांनी नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे.
मशाल मोर्चा
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी सायंकाळी नगर शहरात मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये सकल मराठा समाज, मराठी क्रांती मोर्चासह विविध मराठा संघटना सहभागी झाल्या होत्या. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
साखळी उपोषण
जिल्ह्यातील गावागावात साखळी उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील जो पर्यंत उपोषण सोडत नाहीत तोपर्यंत आम्हीही उपोषण करत राहू अशीही भूमिका आंदोलनकर्ते घेत आहेत. अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवा घेण्यासही उपोषणकर्त्यांनी नकार दिला आहे.
नेतेमंडळींचे राजीनामे
आरक्षण मागणीची धार तीव्र होत चालली आहे. मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यांसाठी अनेक गावपुढाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. अनेक ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, नगरसेवक आदींनी राजीनामे दिले आहेत. अनेक सत्ताधारी आमदार देखील सरकार विरोधात भूमिका घेत आंदोलनांना भेटी देत पाठिंबा देत आहेत.