अहमदनगर। नगर सहयाद्री
मराठा समाजाची धास्ती म्हणण्यापेक्षा सरकारने मराठा समुदायाच्या भावनांशी खेळू नये. सरकार रोज टोलवाटोलवी करत आहे. राज्य सरकारने मान्य केले पाहिजे की आरक्षण देणे राज्य सरकारच्या हातात नाही. मात्र जर राज्य सरकारने आदेश काढून पार्लमेंटला पाठवला तर पार्लमेंट नक्की यामध्ये निर्णय घेऊ शकते. परंतु, फडणवीस यांना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचे नाही, असा हल्लाबोल करीत सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास शिंदे-फडणवीस हेच कारणीभूत आहेत. फडणवीस यांच्यामुळेच मराठा आणि ओबीसीत वाद वाढला असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
मातृतीर्थ ते शिवतीर्थ, सिंदखेड राजा ते शिवाजी पार्क या मुक्त संवाद यात्रेनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे नगरमध्ये आल्या होत्या. यावेळी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, माजी सभापती रामदास भोर, प्रविण कोकाटे, संदीप गुंड, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, नगरसेवक प्रशांत गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या, आज संख्याबळ भाजपकडे आहे. त्यामुळे भाजपची इछाशक्ती असेल तर मराठा आरक्षणाचा कायदा होऊ शकतो, मात्र देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही. सरकारला मराठा-ओबीसी वाद लावून द्यायचा आहे. फडणवीस मराठा-ओबीसी वाद ठरवून लावत आहेत. त्यांना ओबीसीचे देखील काहीही देणेघेणे नाही.
ओबीसींची काळजी फडणवीस यांना असती तर त्यांनी ओबीसी आरक्षणावर गंडातर येऊ दिले नसते. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी न देता पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली असती. जे फडणवीस गोपीनाथ मुंडे यांची बॅग सांभाळायाचे आज तेच फडणवीस पंकजा मुंडे यांचे राजकारण संपवू पाहत आहेत, असा गंभीर आरोपही सुषमा अंधारे यांनी केला.
राणे यांनी मराठा समाजाबद्दल केलेले वक्तव्य निंदणीय आहे. भाजपने राहुल नार्वेकर यांच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादीचे चिन्ह व पक्ष काढून घेतले. त्यामुळे त्यांची कारकिर्द संपुष्टात आली आहे. आमदारांकडून मंत्रीपदासाठी आमच्यावर आरोप केले जात आहेत. भाजपकडून निष्ठावंतांना संपविण्याचे काम चालू असल्याचे त्या म्हणाल्या.
रामदास कदम यांच्यावर टीकास्त्र…
रामदास कदम यांच्यावर फार बोलून त्यांना महत्व देण्याची गरज वाटत नाही. इतरांना ईडी लावायची की नाही ते सोडून द्या पण रामदास कदमांनी बोलताना डोळ्याला झेंडू बाम नक्की लावावा, असे अंधारे म्हणाल्या. ‘उद्धव ठाकरे यांना ईडी लावली पाहिजे, म्हणजे भ्रष्टाचारी कोण हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळेल, असे रामदास कदम यांनी म्हटले होते.
नगरमध्ये ताबेमारीचे प्रकार वाढले
राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. महिला असुरक्षित आहेत. नगरमध्ये ताबेमारीचे प्रकार वाढले आहेत. कर्डिले, जगताप, विखे यांच्या आशीर्वादाने ताबेमारीचे प्रकार वाढल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मार्केट यार्ड आणि मध्यवर्ती शहरातील तक्रारी आहेत. अन्याय झालेल्या लोकांना एकत्र करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.