अहमदनगर। नगर सहयाद्री
महापालिकेच्या कर वसुलीसाठी अद्याप ठोस उपाययोजना होत नसल्याने आयुक्त पंकज जावळे यांनी प्रभागनिहाय वसुलीची जबाबदारी सोपवलेले वरिष्ठ अधिकार्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीत दररोज प्रत्येकी पाच थकबाकीदारांवर जप्ती कारवाईचे आदेश आयुक्त जावळे यांनी दिले आहेत.
मोठ्या थकबाकीदारांची नावे असलेले फलक महापालिकेकडून लावले होते. मात्र, त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. कारवाई व वसुलीसाठी आयुक्त जावळे यांनी उपायुक्त सचिन बांगर, श्रीनिवास कुरे, अजित निकत व सहाय्यक आयुक्त सपना वसावा यांच्यावर चार प्रभाग कार्यालयांची जबाबदारी सोपवली होती.
त्यांच्याकडून वसुलीबाबत समाधानकारक कामकाज न झाल्याने आयुक्तांनी या चौघांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तसेच, आयुक्त स्वतः प्रभाग अधिकारी व कर निरीक्षकांच्या वसुलीचा आढावा घेणार आहेत. दररोज प्रत्येक प्रभाग कार्यालयाने प्रत्येकी पाच थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त जावळे यांनी दिले आहेत.