अहमदनगर । नगर सहयाद्री: –
नगर शहरातील माणिक चौकात दोन समाजाच्या गटांत वाद झाल्याची घटना घडली आहे. घरासमोर येत असलेल्या सांडपाण्याच्या कारणातून दोन गट आमने-सामने आले. त्यामुळे हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे.
शहरातील आदर्श शाळेच्या पाठीमागे सदरचा प्रकार घडला आहे. सलिमा शेख (वय ७५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोरख दाणी, साईनाथ दाणी, भारती दाणी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांनी सांडपाण्याबाबत विचारणा केली असता त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तर दुसरी फिर्याद भारती रमेश दाणी (वय ६२) यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलिमा अकबर शेख, निसार अकबर शेख व रेश्मा निसार शेख यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाणी यांनी सांडपाण्याबाबत विचारणा केली असता त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.