कोपरगाव / नगर सहयाद्री : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून केला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात काल सोमवारी घडली. अरुण रतन दाभाडे (रा. टिळेकर वस्ती, येवला रोड, कोपरगाव) असे आरोपी पतीचे नाव आहे. पुजा अरुण दाभाडे असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी पती अरुण रतन दाभाडे याला अटक केली आहे.
अधिक माहिती नुसार, अरूण दाभाडे हा आपली पत्नी पुजा अरुण दाभाडे (वय २६, रा. जेऊर पाटोदा) हिला चारित्र्याच्या संशयावरून वारंवार त्रास देत होता. काल सोमवारी (दि. १९) दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास पुजा कामावरुन जेऊर पाटोदा येथे घरी जात होत्या.
या दरम्यान आरोपी पती अरुण रतन दाभाडे (रा. टिळेकर वस्ती, येवला रोड, कोपरगाव) याने पत्नीला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांच्या डोक्यात हातोड्याने जबर मारहाण करुन त्यांना जिवे ठार मारले. या प्रकरणी मयत पुजाचे वडील किरण तुळशीराम पठारे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती अरुण दाभाडे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तात्काळ आरोपीला गुन्ह्यात वापरलेल्या हातोड्यासह अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्वास पावरा, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा पुढील तपास करीत आहेत.