अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर शहरातील माळीवाडा बसस्थानक व पुणे बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी नित्त्याचीच होत होती. माळीवाडा परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवार सकाळपासून कारवाई करण्यास सुरुवात केली. अतिक्रमण हटाव पथक पाहताच अतिक्रमण धारकांची एकच धांदल उडाली.
बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. माळीवाडा परिसर, भापकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात आला. यापुढेही दररोज कारवाई सुरु राहणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कापडबाजार, मोची गल्लीतील अतिक्रमण हटणार का?
नगर शहरातील कापड बाजार ही मुख्य बाजार पेठ. परंतु, याच बाजारपेठेत दुकानांच्या समोर हातगाडी वाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. तसेच मोची गल्लीत चालणेही अवघड झाले आहे. कापडबाजारात दुकानांसमोर लागणाऱ्या हातगाड्या, पथारीवाले यांना हटविण्यात यावीत अशी अनेक दिवसांची मागणी आहे. परंतु, महापालिका प्रशासनाकडून किरकोळ कारवाई केली जात आहे. परंतु, आता कापडबाजार व मोची गल्लीतील अतिक्रमण हटविले जाणार का असा सवाल नागरिकांसह व्यावसायिक करत आहेत.