अहमदनगर | नगर सह्याद्री
शासनाने दुधासाठी पाच रुपये प्रतिलिटर अनुदान जाहीर केले होते. परंतु हे अनुदान अद्यापही जमा झाले नाही. सध्या शेतकरी प्रचंड आर्थिक विवंचनेत असून हे अनुदान जमा करावे अशी मागणी दूध उत्पादक शेतकर्यांनी केली आहे. तसे निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
या निवेदनावर ह.भ.प. बाबा झेंडे, कुलदिपसिंह कदम, अमोल लंके, शिवाजी झेंडे, शिवाजी लंके, शिवाजी भोर, पंढरीनाथ टकले, नितीन झेंडे दत्तात्रय झेंडे यांच्यासह चिखली, कोरेगाव, घुटेवाडी, उख्खलगाव, सुरेगाव, नगर, श्रीगोंदा आदी ठिकाणच्या दूध उत्पादक शेतकर्यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, दुधाची विक्री पाण्याच्या भावात सुरु आहे. राज्य सरकारने पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतू अद्याप कसलीही रक्कम दूध उत्पादक शेतकर्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. दुष्काळी गावात पाणीटंचाई सुरु झाल्यामुळे शेतकर्यांना पशुधन वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ही रक्कम तातडीने जमा करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.