मुंबई । नगर सहयाद्री-
अवकाळी पावसाने अख्ख्या महाराष्ट्राला कवेत घेतलंय. उन्हाळ्यातील काही दिवस वगळले तर संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचा मारा सुरू आहे. पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळीचं संकट नेमकं कधी दूर होणार? याची वाट बळीराजा पाहत आहेत. अशातच हवामान खात्याने शनिवार आणि रविवारी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबत काही भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा आणि विदर्भात ताशी ४० ते ५० च्या वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काही भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेतकऱ्यांनी पिकांची तसेच फळबागांची काळजी घ्यावी असा सल्लाही देण्यात आलाय.
‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट?
भारतीय हवामान खात्याने शनिवारी आणि रविवारी पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, सांगली, जालना, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे