मुंबई। नगर सहयाद्री-
राज्यभरातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. काही शहरांच्या कमाल तापमानात वाढ होत आहे तर काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. राज्यात 8 ते 10 एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी, आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पुढील 24 तासात राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. या वाऱ्याच्या परिणामी विदर्भातील अकोला, नागपूर, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, आणि यवतमाळमध्ये आज हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.