Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्या आयशरचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ज (दि.२०) सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान घडली. अशी माहिती गोंदी पोलीसांनी दिली.
सविस्तर असे की, गेवराईहून जालन्याकडे जाणारी गेवराई आगार बस क्रमांक एम एच २० बी एल ३५७३ व अंबडहून संत्रा घेऊन येणारा आयशर क्रमांक एम एच ०१सी आर ८०९९ चा वडीगोद्री जालना मार्गावरील शहापूर जवळ भीषण अपघात झाला. या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने मठतांडा येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले. यात सहाजण जागीच ठार झाले. तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे. या अपघातामधील सहा मृतांपैकी गेवराई येथील वाहक बंडू बारगजे (वय वर्षे ५०) रा. गेवराई व रामपूरी येथील पंचफुला बाई सोळुंके यांची नावे समजली असून इतर जणांचे नाव अद्याप समजली नाहीत. त्याचबरोबर जखमींचे नावे समजू शकली नाहीत. या बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. यामध्ये एका लहान मुलाचा समावेश होता.
अपघात होताच घटनास्थळी मठतांडा येथील नागरिकांनी धाव घेतली. जखमींना बसमधुन बाहेर काढले. अपघाताची पोलीसांना माहिती देताच घटनास्थळी गोंदी पोलिस व वाहतूक पोलिसानी धाव घेत जखमींना रूग्णवाहिका द्वारे अंबड जालना हलविण्यात आले. भीषण अपघातामुळे अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.