spot_img
अहमदनगरबाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

spot_img

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब वर्षातून एका महिन्याचा पगार घेतं

मोरया रे / शिवाजी शिर्के –
बाप्पा काय बोलणार या विचारात संपूर्ण रविवार गेला. बाप्पा, गुबू- गुबू गाण्यावर नाचलेल्या विकीबद्दल बोलणार की, प्रतापच्या भानगडीबद्दल की, आपण आपलं काम चालू ठेवायचं या अवधूतच्या चारोळीवर की दुचाकीवर फेरफटका मारणार्‍या दिग्गज नेत्याबद्दल असा प्रश्नांचा धांडोळा समोर पडला होता. त्यात नगरमध्ये कोतकर विरुद्ध जगताप लढाई झालीच तर काय होईल याबाबतही सोशल मिडियावर चर्चा झडताना दिसत होत्या! या सार्‍या विचारात रविवार गेला! सोमवारी नेहमीप्रमाणे कार्यालयात येऊन कामकाज सुरू करणार तोच दारावरची बेल वाजली आणि दरवाजातून बाप्पाची एंट्री!

मी- बाप्पा, नमक्कार! काल कुठं गायब झाला होतास रे?

श्रीगणेशा- दहा दिवसांच्या कार्यक्रमाचा थकवा घालविण्यासाठी लोणावळ्याची गार हवा खायला गेलो होतो. खुपच मस्त वाटले! येताना देहूला गेलो. संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात नतमस्तक झालो. मंदिरातून बाहेेर आलो तर श्रीगोंद्यातील टोळक्याने मला घेरलं!

मी- (आश्चर्यचकीत परंतू काळजीच्या नजरेने!) टोळक्याने, म्हणजे टपोरी पोरं होती का रे! काही वाईट-साईट नाही ना बोलली ती तूला?

श्रीगणेशा- बाऊन्सर होती रे त्यातील काही! त्यांच्या बोलण्यातून बरंच काही समोर आलं. आडदांड शरीरयष्टीची! याआधी कधी दिसली नाही ही असली पोरं! बापूंच्या जयंतीचा कार्यक्रम काल-परवा श्रीगोंद्यात झाला. त्या कार्यक्रमाला तालुक्यातील सारे पुढारी झाडून हजेरी लावून गेले. बबनदादा त्याला अपवाद होते असं बोलत होती ती पोरं!

मी- बाप्पा, त्यांची तब्येत बरी नसते सध्या! नसतील आले त्यात काय एवढं?

श्रीगणेशा- हो बाबा! ते देखील खरे आहे! पण, सोशल मिडियावर पाचपुतेंना नागवडेंची एवढी कसली अ‍ॅलर्जी यासह तालुक्याचे राजकारण खालच्या स्तरावर गेल्याचं ते सांगत होते.

मी- आवई उठली की उठवली गेली!

श्रीगणेशा- उठवली गेली असंच मला वाटतं! मुळात सार्‍यांना कार्यक्रमाची पत्रिका दिली जात असताना पाचपुतेंना ती का दिली गेली नाही याचेही उत्तर देण्याची गरज आहे. नव्या पिढीतील राजकारण सुरु झालं असलं तरी त्याला जुन्यांनी संस्कार देण्याची गरज आहे. मुळात त्या श्रीगोंद्यात जे काही चालू आहे ते सारं पैशांसाठीच चालू असल्याचं या नव्या पिढीत देखील दिसून येत आहे. गुटखा आणि वाळूच्या टक्केवारीचा आधी होणारा आरोप आताच्या नव्या पिढीतील तरुणांवरही होतोय आणि त्यात तथ्य देखील असल्याची माझी खात्री झालीय! वाळूच्या ठेकेदारीत पाचपुते- नागवडेंचे कार्यकर्ते जाहीरपणे असायचे आणि दोघांकडूनही त्यांची पाठराखण केली जायची! भिमासह अनेक नद्यांची पात्र या दोघांच्याही पंटरांनी ओरबडून कोरडीठाक केली हेही खरंच! वाटून खाण्याच्या सोप्या ट्रीकमुळे त्यांच्यात मुद्याची लढाई गुद्यावर आली नाही! आता नव्या पिढीतही तेच दिसतं! सारं काही वाटून खात असताना आता वाळूच्या जोडीने गुटखा आला! त्याच गुटख्याच्या धंद्यातील पार्टनरशिपमधून भाऊ मोठा झाल्याचे आणि त्यातूनच तो राजकीय प्रतिस्पर्धी झाल्याचे दिसताच त्या धंद्यात आपणच उतरण्याची ‘प्रतापी’ रणनिती आखली गेली. त्यातून आता साखर धंद्यातील परंतू आता राजकीय विरोधक झालेले हे दोघे भाऊ गुटख्या सारख्या धंद्यात पार्टनर झालेच कसे असतील या प्रश्नाचे उत्तर मी शोधतोय! बरं, यातील एकाला विद्येचे माहेरघर म्हणून कधी काळी ओळख असणार्‍या मोठ्या शहरात ड्रग्ज प्रकरण भोवले होते. त्यातून बाहेर काढण्यासाठी भल्या पहाटे पुणे गाठून काय काय भानगडी कराव्या लागल्या हे मी तुला विस्ताराने सांगेलच! मात्र, पैसे कमविण्याची अनेक साधने आणि मार्ग असताना गुटख्या सारख्या अनेकांचे प्रपंच देशोधडीला लावणार्‍या धंद्यातही हे पडू लागलेच कसे! घरातील वडिलधार्‍यांनी त्यांना काही संस्कार दिलेत की नाही!

मी- बाप्पा, तुझा काही तरी गैरसमज झालेला दिसतोय! संस्कारी कुटुंबातील आहेत ते दोघेही!

श्रीगणेशा- झाली का सुरू तुझी चापलुसी! कोण किती पाण्यात आहे आणि कोणाचे कोणाच्या आशीर्वादाने काय काय चालू आहे हे मला जसं ठाऊक आहे तसेच ते तमाम श्रीगोंदेकरांनाही! वाळू तस्करी, सोलापूर रस्त्याने चालणारी नाप्ता तस्करी, गुटख्याची तस्करी, दामदुपटीच्या नावाखाली अनेकांना याच मोठ्यांनी घातलेला गंडा हे सारं सारं श्रीगोंदेकर जाणून आहेत. वेड्याचं सोंग घेण्याची अजिबात गरज नाही. बबनदादा, जयंतीच्या कार्यक्रमाला आले नाही त्यावर इतकी आवई उठविण्याची गरजच नाही. मुळात घरातील समजल्या जाणार्‍या कोणाकोणाच्या सुखदु:खात तुम्ही गेलात ते आधी सांगा ना! गुणवडीची घटना तर रक्ताच्या नात्यातील! तिथे ना तुम्ही अंत्यविधीला गेलात, ना दहाव्याला गेलात, ना तेराव्याला गेलात! किमान कुटुंबाला सांत्वनपर भेट तरी! मात्र, यातील काहीच घडले नाही! श्रीगोंदेकरांना हे माहीती नसेलही! मात्र, नगर तालुक्यासह नातेवाईकांनी याची नोंद ठेेवलीय बरं!

मी- बाप्पा, काय आहे रे गुणवडीची घटना?

श्रीगणेशा- जाऊ दे रे! बबनदादांच्या न येण्यानं आणि त्याआडून भावनिक राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसला म्हणून गुणवडीची घटना आठवली मला! नंतर सांगेल तुला ही घटना मी सविस्तर! देहूत जे टोळकं भेटलं ते बाऊन्सरचं होतं! बापूंनी उभ्या हयातीत असले बाऊन्सर जवळ उभे केले नव्हते! बबनदादांच्या सोबत सरकारी पोलिस दिसायचे! मात्र, तेही मंत्री असताना! एरवी सामान्य कार्यकर्त्यांची फौजच राहायची सोबत त्यांच्या! पण, राजूदादा आणि साजन या दोघांच्यासोबत पिळदार शरीरयष्टी असणारे बाऊन्सर दिसू लागलेत! त्यातही राजू दादांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसोबत ते दिसतात! सामाजिक जीवनात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार्‍या अनुराधाताईंच्या सोबतही हे बाऊन्सर! नेमकं चाललंय काय? कुठे नेऊन ठेवलाय श्रीगोंदा तालुका! याचा अर्थ हे स्वत:च असुरक्षीत आहेत! मग, असे असताना सामान्य श्रीगोंदेकरांचे संरक्षण ही मंडळी कसे काय करणार? बाऊन्सरच्या गराड्यात यांना भेटायचं, त्यांना काम सांगायची आणि तक्रार करायची हेच मोठं आव्हान सामान्य श्रीगोंदेकरांसमोर आहे. कार्यक्रमाला कोण आले आणि कोण आले नाही यावर चर्चा करण्यापेक्षा खरंतर तालुक्यात प्रस्थापित समजल्या जाणार्‍या पाचपुते- नागवडे या दोन कुटुंबातील सदस्यांनी आधी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. दोघांच्याही कुटुंबाला सध्या आमदारकीचे डोहाळे लागलेत! कर्मचार्‍यांचे पगार कापले जातात आणि त्यांची घरे भरतात असा आरोप दोघांवरही आहेच! फरक इतकाच आहे की, एक कुटुंब महिन्याला सात- आठ हजार पगार कापते तर दुसरे कुटुंब वर्षातून एक पगार कापून घेते! फरक काहीच नाही! दोघेही सारखेच! महिन्याला विशिष्ट रक्कम दिली काय आणि वर्षातून एकदा दिली काय बेरीज सारखीच येते! मग, त्याच कर्मचार्‍यांकडून निष्ठेच्या मतांची अपेक्षा तरी काय ठेवायची या साध्या प्रश्नाचे उत्तर दोघांनीही देण्याची गरज आहे. बाऊन्सर ठेवायची वेळ येतेच कशी याचे आत्मचिंतन होणार आहे नाही! अरे बाबा, यांना देवस्थानांच्या जमिनी देखील पुरल्या नाहीत रे! राऊळबुवा देवस्थानच्या जमिनीचं मॅटर मोठं आहे. शेकडो एकर जमिन अत्यंत सोयीस्कर असा कट रचून हडप करण्यात आली. कारखान्यातील भानगड बाहेर यायला नको म्हणून दादांचं घड्याळ बांधलं गेलं! शेजारच्या जिल्ह्यातील साखर कारखाना विकत घेतला, त्याचा जीएसटी आणि प्रक्रिया प्रकल्प यासाठी कोट्यवधी रुपये कसे मिळवले, कोणी मिळवले हेही सांगणार आहेच! ‘राऊळबुवा’ देवस्थानची भानगड बाहेर आली तर त्यांची रवानगी येरवड्यात देखील होऊ शकते! बरंच काही आहे रे! बोलणार आहे मी त्यावरही! तूर्तास वेळ झालीय माझी निघण्याची! उद्या पुन्हा भेटू असं बोलून बाप्पा चालता झाला!
(उद्याच्या भेटीत बाप्पा कायकाय बोलणार आणि कोणाचा भांडाफोड करणार याची उत्सुकता कायम ठेवत मी देखील माझ्या कामाला प्रारंभ केला.)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...