अहिल्यानगर । नगर सहयाद्री
नगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव शिवारात गुरुवारी (दि. ४ सप्टेंबर) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव खासगी बसने ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॉली पलटी झाली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
एक खाजगी बस आणि अपघातातील ट्रॅक्टर अहिल्यानगरच्या दिशेने येत होत्या. भरधाव बसने अचानक वळण घेतल्याने ट्रॅक्टरला जोराची धडकी बसली. धडकेचा जोराने ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाला. ट्रॅक्टर ट्रॉली मधील पाच जणांपैकी दोघांचा जागीच मृत्यु झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावर मोठा गोधळ निर्माण झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकनागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
सेवानिवृत्त शिक्षक अपघातात ठार
नगर-मनमाड महामार्गावर लागोपाठ दोन दिवसांत तीन अपघात झाले आहे. काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राहुरी खुर्द येथे दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश दत्तू साबळे (वय 68) हे जागीच ठार झाले. तर राहुरी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. रामनाथ डोके हे जखमी झाले. काल सायंकाळी प्रकाश साबळे हे आपले सहकारी शिक्षक डोके यांच्या समवेत कृषी विद्यापीठाहून आपल्या घरी जात असताना राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड रस्ता ओलांडत असताना राहुरीकडून अहिल्यानगरच्या दिशेने जात असलेल्या कंटेनर (आरजे 14 जीटी 0069) ने पाठीमागून जोराची धडक दिली. या आपघातात साबळे व डोके दोघेही रस्त्यावर पडले. साबळे यांच्या अंगावरून कंटेनरचे मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला तर डोके हे जखमी झाले. त्यांना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नगर-मनमाड महामार्गावर गेल्या दोन दिवसांत चार अपघात झाले असून चौघांनाही आपले प्राण गमवावे लागले. नगर-मनमाड महामार्गावरील रस्ता अत्यंत धोकादायक असून प्रचंड खड्ड्यांमुळे वाहतुकीस असुरक्षित झाला आहे. मात्र संबधित यंत्रणा कोणतीही दखल घेण्यासाठी तयार नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.