मुंबई / नगर सह्याद्री :
अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली.ते ठाकरे गटाचे माजी नगरसेवक होते. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले. आता विरोधकांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. विरोधकांचे आरोप राजकीय असून त्यांनी राजीनाम्याची मागणी केली त्यात आश्चर्य वाटत नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.
घोसाळकर हत्या प्रकरणी फडणवीस म्हणाले की, अभिषेक घोसाळकर यांच्याबाबतीत घडलेली घटना दु:खद आहे. एका तरुण नेत्याचे असं निधन व्हावं हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायेत हे योग्य नाही.
ही घटना गंभीर असली तरी ज्याने गोळ्या घातलेल्या तो मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे एकत्रित पोस्टर्स पाहायला मिळतात. वर्षोनुवर्ष ते एकत्रित काम करतायेत. आता कुठल्या विषयातून मॉरिसनं अभिषेकवर गोळ्या झाडल्या आणि स्वत:लाही गोळ्या मारून घेतल्या हा निश्चितपणे महत्त्वाचा विषय आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत विरोधक पूर्णपणे राजकीय आरोप करत आहेत. ही घटना गंभीर आहे. परंतु विरोधी पक्षाची स्थिती अशी झालीय की एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. मात्र ही घटना गंभीर असल्याने विरोधक राजीनामा मागतायेत त्यात आश्चर्य वाटत नाही. या सगळ्या घटनांचे राजकारण ते विरोधक करू इच्छित आहेत. ही जी हत्या झालीय ती वैयक्तिक वैमनस्यातून झालेली आहे ही विरोधकांना माहिती आहे. पण विरोधी पक्षाचे काम विरोधी पक्ष करतोय असा टोला देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावला.