अहमदनगर । नगर सहयाद्री
मुलीला वारंवार मारहाण करत असल्याने सासुरवाडीतील नातेवाईकांनी मारहाण करून बांधून जावयाचे चारचाकी वाहनातून अपहरण केले. रवींद्र रामदास भिसे (रा. गुंडेगाव ता. नगर) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात १० ते १२ नातेवाईकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी: रवींद्र हा पत्नीला वारंवार मारहाण करत होता. याबाबत पत्नीने तिच्या माहेरी कळविले होते. बुधवारी (दि. २२) रवींद्रने पत्नीला पुन्हा मारहाण केली. त्यामुळे ती घरातून निघून गेली. दरम्यान रात्री साडेदहा वाजता सासुरवाडीतील काही नातेवाईक जावई रवींद्रच्या घरी आले.
त्यांनी रवींद्रला मारहाण करून दोरीने बांधून वाहनात टाकले व घेऊन गेले. रवींद्रचा शोध घेतला असता ते मिळून न आल्याने अल्पवयीन मुलीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोघांना अटक केली असून रवींद्रचा शोध घेत आहेत.