मुंबई। नगर सहयाद्री-
राजकीय वर्तुळातून एक अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादीला भाजपाने पुन्हा सुरुंग लावला असून राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला मोठा धक्का दिला आहे. विजयाची हॅट्रीक मारणाऱ्या बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे २ जुलैला त्यांच्या ९ आमदारांसह नाट्यमयरित्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. सरकारमध्ये सहभागी होताच पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आल्यामुळे महायुतीला मोठे बळ मिळाले.
दुसरीकडे शरद पवार गट यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांच्या विश्वासू शिलेदाराने भाजपची वाट धरली आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रीक मारणारे सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.