अहमदनगर । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड (Madhukar Pichad) आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांनी आज शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट घेतली. सिल्वर ओक ( Silver Oak ) निवासस्थानी झालेल्या या अर्धा तासाच्या चर्चेमुळे पिचड कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र अकोले विधानसभेची जागा महायुतीत सुटत असल्यामुळे आता ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. या भेटीच्या संदर्भात, काही स्रोतांनी सांगितले की, पिचड यांनी पेसा कायद्यासंदर्भात चर्चा केली.
मधुकर पिचड आणि त्यांच्या मुलाने २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. आता पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहेत. पण महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे चिन्ही तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.