निघोज | नगर सह्याद्री
राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. मंगळवार 22 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता निघोज ग्रामस्थ व लाखो भाविक यांनी मळगंगा देवीचे दर्शन घेऊन व पालखी घेऊन सकाळी साडेसात वाजता देवीच्या हेमाडपंती बारवेकडे पालखी घेऊन गेले. त्याठिकाणी मानकरी तसेच देवीचे पुजारी संतोष गायखे यांच्या हस्ते देवीच्या श्रींची घागरीची विधिवत पूजा केली. त्यानंतर मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या लाखो भाविकानी मळगंगा देवीच्या जयजयकाराच्या घोषणा देत आसमंत दणाणून टाकला.
राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची घागर मिरवणूक हा एक अद्वितीय सोहळा पाहण्यासाठी व घागर माध्यमातून देवीचे प्रत्यक्ष दर्शन होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. शेकडो वर्षांपासून ही श्रद्धा परंपरा जतन करण्याचे भाविक मोठ्या उत्साहात करीत आहेत. सकाळी आठ वाजता देवीच्या श्रीं ची घागर मिरवणूक बारवेपासून सुरू झाली. शेकडो महिला पितळी तसेच इतर धातूच्या कळशा घेऊन या घागर मिरवणुकीच्या मागे देवीचे भक्तिमय गाणे म्हणत तसेच देवीचा जयजयकार करीत मोठया श्रद्धेने सहभागी झाल्या होत्या.
ही मिरवणूक जुनी पेठेच्या मागील पेठेतून मळगंगा मंदिरापर्यंत आल्यानंतर देवीच्या मंदिराबाहेर देवीच्या पुजारी संध्या गायखे, सुवर्णा गायखे, सारिका गायखे, रूपालीताई गायखे यांच्या हस्ते घागरीचे औक्षण करण्यात आले. या ठिकाणी पुजारी सुनील गायखे, ठकाराम गायखे, संतोष गायखे, दादू गायखे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी लाखो भाविकांनी देवीचा जयजयकार करीत टाळ्यांचा कडकडाट करीत माता मळगंगा देवीचा साक्षात्काररूपी घागरीचे जोरदार स्वागत केले.
यावेळी गावकऱ्यांनी मळगंगा मंदिर तसेच घागर यावर ड्रोनच्या साहाय्याने पुष्पवृष्टी केली. प्रथमच घागर, मंदिर व मिरवणूक यावर पुष्पवृष्टी झाल्याने भाविकांमध्ये उस्तुकता निर्माण झाली होती. त्यानंतर हीच मिरवणूक मुख्य पेठेतून ग्रामपंचायत चौक मार्गे पुन्हा देवीच्या बारवेजवळ आली. मिरवणुकीदरम्यान मुख्य पेठेतील प्रत्येक घरावर देवी दर्शनासाठी हजारो भाविक उभे होते. सकाळी आठ वाजता सुरू झालेली ही श्रींच्या घागर मिरवणुकीची सांगता पुन्हा देवीच्या हेमाडपंती बारवेत करण्यात आली. यावेळी देवीचे पुजारी संतोष गायखे यांनी बारवेत विधिवत पूजा करून घागरीचे पाण्यात विसर्जन केले. तब्बल दीड तासाच्या या मिरवणुकीत लाखो भाविक मोठ्या सहभागी झाले होते.
त्यानंतर भाविकांनी गाव व परिसरात ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी सवाष्णी कार्यक्रम करीत माता मळगंगा देवीला पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण केला. दुपारी चार वाजता देवीच्या 85 फूट उंचीची काठी तसेच पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सायंकाळी जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड या ठिकाणी असलेल्या मळगंगा मंदिराच्या शिखराला लागल्यानंतर या ठिकाणी कुंडाची यात्रा सुरू झाली. बुधवार दि.23 रोजी दुपारी चार वाजता नामवंत पैलवानांचा कुस्त्यांचा हगामा या ठिकाणी होत असून निघोज ग्रामस्थांच्या वतीने लाखो रुपयांची बक्षिसे नामंकीत पैलवानांना देण्यात येणार आहेत. या कुस्ती हगाम्याने कुंड यात्रेची सांगता होत असते. यात्रेसाठी पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार काशीनाथ दाते यांनी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्याने पाटबंधारे विभागाचे कुकडी डावा कालवा नारायणगाव विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच निघोज शाखाधिकारी पाटील यांनी निघोज येथील कपिलेश्वर बंधाऱ्याला वेळेवर पाणी सोडून लाखो भाविकांची पाण्याची व्यवस्था केली. एसटी बससेवा सदोदित सुरु राहून आळेफाटा, पारनेर, शिरुर येथून तसेच निघोज ते कुंड स्पेशल यात्रा बसेस सोडून मोठ्या प्रमाणात भाविकांचा प्रवास सुखकर केल्याबद्दल यात्रेकरू व भावीक तसेच ग्रामस्थ यांनी पारनेरचे एस टी आगार व्यवस्थापक व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.
शेकडो वर्षापासून या यात्रेचे नियोजन अगदी यथायोग्य केले आहे. सर्व जातीजमातींना या यात्रेची जबाबदारी दिली असून ही यात्रा सर्वसमावेशक कशी होईल यासाठी प्रयत्न केले आहेत. आजही तीच परंपरा व रुढी सुरू आहे. शिंपी समाजाला मनोहर दिवसे, अब्दागिरीचा मान, कोष्टी समाजाला श्रीकांत शेवाळे, चवरीचा मान, ब्राह्मण समाज, सचिन धोंगडे यांना तसेच इतर समाजाला सुद्धा महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. धोलवड, उंब्रज, चिंचोली, भिंगार बेलापूर, नेवासा येथील मळगंगा देवीचे स्थान असलेल्या गावातील मानकऱ्यांना देवी पूजा, घागर पूजा मान देऊन सन्मान करण्याचे काम होत आहे.
खासदार आमदार यांची उपस्थिती
खासदार नीलेश लंके, आमदार काशीनाथ दाते, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, माजी तालुकाध्यक्ष वसंत चेडे, सरपंच दत्ता नाना पवार, सरपंच पंकज कारखिले, देवीभोयरे सरपंच अशोकराव मुळे, वडनेर सरपंच राहुल सुकाळे, शिरापूर सरपंच भास्कर उचाळे तसेच ईतर मान्यवर आदिंनी देवीचे दर्शन घेऊन मळगंगा ट्रस्ट, गावकरी समिती या ठिकाणी भेट दिली व गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट विश्वस्त अनिल लंके व माजी उपसरपंच उमेश सोनवणे यांनी केले.