अहमदनगर | नगर सह्याद्री:-
गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे पुढे घेण्यावरून झालेल्या वादानंतर एका मंडळाच्या १४ ते १५ जणांच्या जमावाने दुसर्या मंडळातील वाद घालणार्या तरुणाला हॉटेल मध्ये लपवून ठेवल्याच्या संशयावरून हॉटेल व्यावसायिकावर तलवार कोयत्याने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुयातील बाबुर्डी बेंद येथे गुरुवारी (दि.१९) रात्री घडली.
या हल्ल्यात हॉटेल व्यावसायिक मनोज उर्फ दत्तात्रय बाजीराव चोभे (वय ३८, रा. बाबुर्डी बेंद, ता. नगर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या उजव्या हाताचा अंगठा तुटला आहे. त्याने नगरमधील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी दिपक साळवे, राम साळवे, लखन साळवे, साहेबराव कोंडाजी साळवे, शिवाजी गबाजी साळवे, शिवराज अशोक इंगळे (रा. बाबुर्डी बेंद, ता.नगर), किरण कांबळे, प्रविण कांबळे (रा.आरणगाव, ता.नगर) व त्यांच्या सोबत अरणगावचे ७ ते ८ अनोळखी इसम अशा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यावर यातील साहेबराव कोंडाजी साळवे, शिवाजी गबाजी साळवे, शिवराज अशोक इंगळे या ३ आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी (दि.२०) पहाटे ४ च्या सुमारास अटक केली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी तसेच जखमी उपचार घेत असलेल्या रुग्णालयात भेट दिली. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी मोहीम राबवत पहाटे ४ वाजे पर्यंत ३ आरोपींना पकडले आहे.