अहिल्यानगर | नगर सह्याद्री
चितळे रस्त्यावरील एस. वाय. टेलर दुकानात घुसून एका टोळक्याने तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी (19 एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास घडली. हल्ल्यात शंकर रामचंद्र नल्ला (वय 60 रा. तोफखाना) यांच्यासह त्यांचा मुलगा समर्थ आणि पुतण्या प्रसाद जखमी झाले असून, शंकर नल्ला यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान झटापटीत त्यांच्या गळ्यातील अंदाजे पाच तोळे वजनाची सोन्याची चैनही गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.
शंकर नल्ला हे टेलरिंगचा व्यवसाय करत असून, मिरवली दर्गा समोरील चितळे रस्त्यावर त्यांचे दुकान आहे. शनिवारी रात्री ते दुकानात बसले असताना, सागर आडसुळ, ऋषीकेश रंगा, अभिजित आडसुळ आणि त्यांच्यासोबत आणखी चार अनोळखी इसम दुकानात घुसले. त्यांनी लाकडी दांडके व धारदार शस्त्रांनी शंकर नल्ला यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांच्या आरडाओरडीनंतर पुतण्या प्रसाद व मुलगा समर्थ यांनी मदतीसाठी धाव घेतली असता, त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली.
हल्ल्यात शंकर नल्ला यांना डोक्यावर धारदार शस्त्राने गंभीर इजा झाली असून, समर्थ यालाही दोन्ही हात, पाठ आणि डोक्यावर मार बसल्याने तोही बेशुध्द झाला. त्यांना तातडीने घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सदर हल्ला मागील सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर झाला असून, हल्लेखोरांनी जीवे ठार मारण्याची धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सागर आडसुळ, ऋषीकेश रंगा, अभिजित आडसुळ आणि चार अज्ञात इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.