अहिल्यानगर | नगर सह्याद्री
एमआयडीसी परिसरात एका टोळयाने तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बाळासाहेब नामदेव वाघ (वय ३८ मुळ रा. लोहगाव, ता. नेवासा, हल्ली रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांनी सोमवारी (३१ मार्च) दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश आव्हाड, गणेशचा मित्र व दोन अनोळखी यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, २१ मार्च रोजी रात्री १० वाजता नवनागापूरच्या विक्रम शेवाळे चौक, गणेश पान स्टॉल येथे संशयित आरोपी गणेश आव्हाड आणि त्याच्या तीन साथीदारांनी त्यांच्यावर मागील भांडणाच्या कारणावरून हल्ला केला. यामध्ये फिर्यादीला कोयत्याने मारहाण करत पाठीत आणि डाव्या हाताच्या कोपरावर गंभीर जखमा केल्या. तसेच, उजव्या हाताच्या बोटांतील अंदाजे सहा ग्रॅम व आठ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या जबरदस्तीने काढून घेतल्या असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस अंमलदार चौधरी अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, एमआयडीसी परिसरात किरकोळ करणावरून वाद होऊन शस्त्राने हल्ला होत असल्याच्या घटना नेहमी घडत आहे. त्याला एमआयडीसी परिसरातील अवैध धंदे कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. नशेच्या आहारी गेलेल्या तरूणांकडून किरकोळ वादातून व्यावसायिक, कामगार यांच्यावर हल्ला केला जात आहे. पोलिसांनी अवैध धंदे बंद करावे अशी मागणी होत आहे.
तरूणावर हल्ला
भावासोबतच्या व्यवहाराच्या वादातून तरूणावर टोळयाने हल्ल्या केल्याची घटना अहिल्यानगर तालुयातील सारोळा कासार, जिरेडोह येथे रविवारी (३० मार्च) रात्री ९:३० वाजता घडली. मनोज भाऊसाहेब कडूस (वय ३३ रा. सारोळा कासार, जिरेडोह) असे जखमी तरूणाचे नाव आहे.त्यांनी सोमवारी (३१ मार्च) दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धैर्यशिल रामकृष्ण लावंड, रामकृष्ण लावंड, सचिन साळुंखे (सर्व रा. अकलुज, ता. जि. सोलापूर), अशोक लेंभे (रा. फलटण, जि. सातारा) व शेखर जगताप (रा. सासवड, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी मनोज कडुस यांच्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी हे रविवारी रात्री फिर्यादीच्या घरासमोर आले. त्यांनी फिर्यादीला त्यांचा भाऊ महेश कडुस कुठे आहे, अशी विचारणा केली. फिर्यादीने मला माहिती नाही असे सांगताच संशयित आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत हातातील लाकडी स्टम्पने मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार आर. आर. व्दारके करीत आहेत.