मुंबई / नगर सह्याद्री :
दारूप्रेमींसाठी वाईट बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने देशी, भारतीय बनावटीच्या विदेशी आणि आयात विदेशी मद्याच्या दरात तब्बल ९ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, दारूच्या किमतीत १० ते ८५ रुपयांपर्यंत वाढ होणार असून, सरकारच्या तिजोरीत दरवर्षी सुमारे १४ हजार कोटींची भर पडणार आहे.
मैफलांचा खर्च वाढणार!
मैफली जमवून दारूचा आस्वाद घेणाऱ्यांच्या खिशाला आता चांगलाच फटका बसणार आहे. देशी दारूची किंमत आता ७० रुपयांवरून ८० रुपये, तर विदेशी दारूच्या प्रीमियम ब्रँडची किंमत ३३० वरून ३६० रुपये झाली आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी दारूचे दर १५० वरून थेट २०५ रुपये इतके वाढले आहेत.
लायसन्स शुल्कातही झेप
दारू विक्री लायसन्ससाठीही सरकारने हात पुढे केला आहे. एफएल-२ आणि एफएल-३ परवाना धारकांना आता १५% आणि १०% अधिक शुल्क भरावे लागणार आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना याचा थेट आर्थिक फटका बसणार असून, ग्राहकांवरही याचा भार वाढेल.
‘मद्य नियंत्रण कक्ष’ची स्थापना
या वाढीच्या पार्श्वभूमीवर सरकार उत्पादन शुल्क विभागाच्या बळकटीकरणासाठी पुढे सरसावले आहे.
एआय प्रणालीवर आधारित नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे,
मुंबईसह ६ जिल्ह्यांत नवीन विभागीय कार्यालये,
१२२३ नवीन पदभरती करण्यात येणार आहे.
आधी अधिसूचना, मग दरवाढ
या निर्णयाची अंमलबजावणी अधिसूचना जाहीर झाल्यानंतर होईल. तोपर्यंत जुन्याच दराने मद्यविक्री सुरू राहील. राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी तयार करण्यात आलेला अहवाल एप्रिलमध्ये सादर झाला होता, आणि तो आता मंत्रिमंडळाने मान्य केला आहे.
१८० मि.ली. बाटलीची किरकोळ विक्रीच्या किमान किमतीतील मद्य प्रकारनिहाय
दारूचा प्रकार सध्याचे दर नवीन दर
देशी मद्य ७० रुपये ८० रुपये
महाराष्ट्र मेड लिकर नवीन प्रकार १४८ रुपये
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य १२० ते १५० रुपये २०५ रुपये
विदेशी मद्याचे प्रीमियम ब्रँड ३३० रुपये ३६० रुपये